पू. वैद्य विनय भावेकाका यांच्या देहत्यागाची वार्ता समजल्यावर काही वैद्यांनी सामाजिक माध्यमांमध्ये उत्स्फूर्तपणे केलेले लिखाण

मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी रात्री १० वाजता मोर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथे देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागाची वार्ता समजल्यावर काही वैद्यांनी सामाजिक माध्यमांवरून पू. भावेकाका यांना पुढीलप्रमाणे शब्दरूपी आदरांजली वाहिली. त्यातील २ वैद्यांचे अभिप्राय येथे देत आहोत.

पू. वैद्य विनय भावे

भावेकाका यांच्या निधनाने आम्ही एका अनुभवी आणि प्रेमळ व्यक्तीमत्त्वाला मुकलो ! – वैद्य समीर मुकुंद परांजपे, दापोली, जिल्हा रत्नागिरी.

वैद्य समीर परांजपे

‘आमचे कोकणवासी, लाडके आणि प्रसिद्धीपराङ्मुख भावेकाका गेल्याची वार्ता कळली आणि फार वाईट वाटले. मागील मासात एक विशेष रसायन (औषध) बनवून ते स्वतः आमच्या घरी घेऊन आले होते आणि ते कसे वापरायचे, तेही त्यांनी मला सांगितले होते.

एवढा मोठा विद्वान माणूस; पण विद्वत्तेचा जराही गर्व नाही. अनुभव मात्र प्रगाढ ! माझ्याकडे नावे नसलेल्या मात्रा (औषधे) दाखवल्यावर त्यांनी त्या सहाणेवर घासून ‘कोणत्या आहेत’, याची माहिती सांगितली. आयुर्वेदात औषधे बनवायला अग्नीची उत्तम जाण असणे आवश्यक असते, तसेच रुग्णाला औषधे देतांना रुग्णाच्या जठराग्नीचीही उत्तम जाण असणे आवश्यक असते. अशा दोन्ही अग्नींची उत्तम जाण असलेल्या वैद्याला ‘अग्निमानविद्’ असे म्हणतात. भावेकाका हेही एक ‘अग्निमानविद्’ होते.

असे हे आमचे भावेकाका स्वयंपाकसुद्धा उत्तम करायचे आणि भरपूर खाऊ घालायचे. तरुणांनी मजबूत आहार करून बलसंपन्न झाले पाहिजे. भावना द्यायला बसल्यावर (औषधे घोटायला बसल्यावर) बळ न्यून पडता कामा नये; म्हणून ते सूर्यनमस्कार घालायला सांगत. ‘वैद्य धष्टपुष्ट आणि तेजःपुंज असायला हवा’, असे ते आम्हाला सांगत. स्वतः मात्र मिताहारी राहून सात्त्विक अन्न खाऊन समंत्रक (मंत्र म्हणत) औषधनिर्मिती करत.

एवढ्या उतार वयातही त्यांचा उत्साह कायम होता. ‘हीरकाचे (हिर्‍याचे) भस्म करायला घेणार आहे’, असे ते मागील मासात म्हणाले होते. असो त्यांच्या विषयी लिहू तेवढे कमीच आहे. त्यांना सद्गती लाभेलच. आम्हाला त्यांचे स्मरण सदैव राहो एवढीच प्रार्थना !

वैद्य विनयजी भावेकाका यांच्यासारख्या देवमाणसाचे अचानक निघून जाणे खरेच अत्यंत क्लेशदायक आहे ! – वैद्य मंगेश ठमके, कोल्हापूर

वैद्य मंगेश ठमके

‘औषधनिर्मितीच्या प्रवासामध्ये आजवर मला अनेक वैद्यांचे मार्गदर्शन मिळाले. अनेक वैद्यांनी वेगवेगळ्या योजना आणि क्लृत्या सांगितल्या; परंतु कित्येक पिढ्यांची परंपरा असलेले वैद्य अल्पच भेटले. वैद्य विनयजी भावेकाका म्हणजे एक देवमाणूस ! औषधे बनवण्यात आपल्याला जे माहिती आहे, ते सर्वच्या सर्व आपल्या प्रतिस्पर्ध्यालाही सांगायला ते कधीही संकोच करत नसत. काकांची सात्त्विकता त्यांच्या आचरणात नेहमीच दिसे. मंत्रपठण, व्रते हा तर त्यांच्या आवडीचा विषय होता. असे हे आमचे काका अतिशय मनमोकळेपणाने रहाणारे, बोलणारे आणि आपल्या गोड हसण्याने क्षणार्धात सर्वांना आपलेसे करणारे होते. त्यांनी मला ‘भस्म’ बनवण्याच्या विविध पद्धती शिकवल्या. एखादे अवघड औषध बनवत असतांना ते मला आवर्जून बघायला बोलवायचे. कोणतेही औषध बनवत असतांना त्यांचे स्वतःचे काटेकोर लक्ष असायचेच. ‘कूपीपक्व रसायन’ (आयुर्वेदातील एक कठीण औषधाचा प्रकार) बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. एखादी औषधी वस्तू किंवा भस्म उपलब्ध नसेल, तर ते स्वतः बनवूनच ठरलेले औषध पूर्ण करत असत. ‘औषध बनवतांना उत्तम प्रतीचा कच्चा माल वापरून बनवणे’, हे काकांचे  वैशिष्ट्य होते. गुरूंचा ‘वरदहस्त’ असल्याविना ‘औषधीकरण’ जमणे नाही ! कोल्हापूरला आल्यानंतर ते आम्हाला आवर्जून भेटायचे. काही औषधे करण्याचेही आम्ही ठरवले होते. काल काकांनी देह ठेवला. आयुर्वेद क्षेत्राची अपरिमित हानी झाली. अशा देव माणसाचे अचानक निघून जाणे खरेच अत्यंत क्लेशदायक आहे. ईश्‍वर शांत आत्म्यास चिरशांती देवो, ही इच्छा. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।

कठीण शारीरिक स्थितीतही साधकांसाठी अहोरात्र झटणारे पू. वैद्य भावेकाका !

वैद्य मेघराज पराडकर

‘आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातन काही आयुर्वेदीय औषधांची निर्मिती करत आहे. या सेवेचे पूर्ण उत्तरदायित्व पू. वैद्य विनय भावेकाका यांनी स्वतः उचलले होते. ‘सर्वत्रच्या साधकांना लवकरात लवकर उत्तम गुणवत्तेची आयुर्वेदीय औषधे मिळावीत’, अशी तीव्र तळमळ त्यांच्यामध्ये होती. त्यांना मधुमेह आणि हृदयासंबंधी विकार होता. त्यांची प्रकृती बरी नसायची; परंतु त्याही स्थितीत ते केवळ ‘साधकांसाठी औषधे बनवायला हवीत’, या एका ध्यासाने प्रतिदिन त्यांच्या घरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या औषधनिर्मिती केंद्रामध्ये जाऊन औषधनिर्मितीमध्ये जातीने लक्ष घालायचे. आठवड्याला त्यांचा ५०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास व्हायचा. ‘औषधनिर्मिती’ हे व्रतच त्यांनी घेतले होते. आपत्काळाच्या दृष्टीने पूर्वसिद्धता म्हणून २०० हून अधिक आयुर्वेदीय औषधे बनवण्याचा त्यांचा मानस होता आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही चालू केले होते.

कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वत्रच्या साधकांना उपयुक्त असे आयुर्वेदीय औषधांविषयीचे लेख त्यांनी लिहिले होते. त्यांच्या या लेखांप्रमाणे आचरण करून अनेक साधक बरे झाले. आयुर्वेदासंबंधी काहीही शंका असल्या, तरी पू. भावेकाका त्यांचे निरसन करत असत. पू. भावेकाका यांचा आम्हा वैद्यांना पुष्कळ आधार वाटायचा.

आयुर्वेदीय औषधांच्या निर्मितीसंबंधीच्या सेवेच्या निमित्ताने गेले काही मास मला पू. भावेकाकांचे सान्निध्य लाभले. या काळात त्यांच्याकडून केवळ औषधनिर्मितीच्या संबंधीच नव्हे, तर ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, यासंबंधीही पुष्कळ शिकायला मिळाले. पू. भावेकाका म्हणजे निरपेक्ष प्रेमाचे सगुण रूप होते. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर आम्हा वैद्य साधकांची वाटचाल निरंतर होण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव राहू दे, ही त्यांच्या चरणी प्रार्थना !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२१)