पाकिस्तान एफ्.ए.टी.एफ्.च्या काळ्या सूचीमध्ये जाण्यापासून पुन्हा बचावला !

पाक करड्या सूचीमध्ये कायम !

मुळात जागतिक देशांनी पाकला ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे ! भारतानेही तशी सातत्याने मागणी केली पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आतंकवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करणारी आंतरराष्ट्रीय संघटना ‘द फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (एफ्.ए.टी.एफ्.ने) पाकिस्तानला करड्या (ग्रे) सूचीमध्ये कायम ठेवले आहे. या संघटनेने पाकवर आर्थिक गैरव्यवहार, आतंकवाद्यांना होणारे अर्थसाहाय्य न रोखणे आदी ठपका ठेवला आहे.

१. या संघटनेने पाकला उद्देशून म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांनी आतंकवादी म्हणून घोषित केलेल्या संघटनांच्या प्रमुखांचा शोध घेऊन पाकने त्यांच्यावर खटले भरावेत. यांंमध्ये मुंबईवर वर्ष २००८ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार हाफीज सईद आणि मसूद अझहर यांचाही समावेश आहे.

२. या संघटनेचे अध्यक्ष मार्कस प्लिअर यांनी सांगितले की, वर्ष २०१८ मध्ये पाकला सांगितलेल्या २७ पैकी २६ गोष्टींची पूर्तता त्याने केली आहे.

३. करड्या सूचीतून बाहेर पडून पांढर्‍या सूचीमध्ये येण्यासाठी पाकला या संघटनेतील ३९ पैकी १२ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्या चीन, तुर्कस्तान आणि मलेशिया या देशांच्या समर्थनामुळे पाक काळ्या सूचीमध्ये जाण्यापासून वाचला आहे.