नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचे प्रकरण
नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी सिडकोला घेराव घालणारे आजी-माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि अन्य आंदोलक अशा १८ सहस्र जणांवर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी २४ जूनला पालघर ते रायगड परिसरातील भूमीपुत्रांनी आंदोलन केले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक नवी मुंबई शहरात आले होते. त्यामुळे येथे विविध कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे गुन्हे नोंद करण्यात आले, अशी माहिती एन्.आर्.आय. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे.
यामध्ये ४ माजी खासदार, २ माजी मंत्री, ७ आमदार, २ माजी आमदार, नवी मुंबईचे माजी महापौर आणि उपमहापौर, पनवेल महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांच्यावरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री रविशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पनवेल महानगरपालिकेचे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे.डी. तांडेल, दशरथ भगत यांच्यासह सहस्रो आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.