महापालिकेने लहान मुलांसाठी स्वतंत्र १ सहस्र खाटांचे रुग्णालय उभारावे ! – शिवसेनेचे महापालिका आयुक्तांना निवेदन

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस (उजवीकडे) यांना निवेदन देतांना शिवसैनिक

सांगली, २४ जून (वार्ता.) – सध्या कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येऊ घातली आहे. ही लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने लहान मुलांसाठी १ सहस्र खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारावे, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना देण्यात आले. हेच निवेदन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनाही देण्यात आले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका ७५ लाख रुपये व्यय करून ‘ऑक्सिजन प्लान्ट’ उभारत आहे. यातून १२५ ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार आहे; मात्र तिसर्‍या लाटेचे गांभीर्य ओळखून ५०० सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावेत. तिसर्‍या लाटेसाठी ८० ते १०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. या ‘प्लान्ट’ची क्षमता वाढवावी. या वेळी माधवनगरचे उपसरपंच बाळासाहेब मगदूम, जितेंद्र शहा, अनिल शेटे, पंडितराव बोराडे, रावसाहेब घेवारे, लक्ष्मण वडर, सचिन नागरे इत्यादी उपस्थित होते.