नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत स्थानिकांचा सिडकोच्या कार्यालयाला घेराव !

  • आंदोलनात सहस्रावधी ग्रामस्थ सहभागी

  • १५ ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास १६ ऑगस्टला विमानतळाचे काम बंद पाडण्याची चेतावणी

मुंबई – नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांनी २४ जून या दिवशी येथील सिडकोच्या कार्यालयाला घेराव घातला. सहस्रावधींच्या संख्येने एकवटलेल्या आंदोलकांनी शासनाला १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली असून तळाला दि.बा. पाटील यांचे नाव न दिल्यास १६ ऑगस्ट या दिवशी विमानतळाचे काम बंद पाडण्याची चेतावणी दिली आहे. या वेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडकोच्या अधिकार्‍यांना मागणीचे निवेदन दिले.

दि.बा. पाटील यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने प्रकल्पग्रस्त असलेल्या १८ गावांतील संघर्ष समित्यांनी हा मोर्चा काढण्यात आला. विविध गावांतील आंदोलक सिडकोच्या कार्यालयाजवळ पोचले. मोर्च्यामध्ये नवी मुंबई, उरण, पनवेल, ठाणे, कल्याण येथून मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्त असलेल्या पारगाव येथून शेकडो ग्रामस्थ टाळ-मृदुंग घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक वाशी टोलनाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग, शीळफाटा या मार्गाने वळवण्यात आली होती.

या आंदोलनामध्ये मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत पाटील आणि आमदार गणपत गायकवाड हेही सहभागी झाले होते. यापूर्वी भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून दि.बा. पाटील यांच्या नावाचे समर्थन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र याविषयीची भूमिका अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.

काय आहे नावाचा वाद ?

नवी मुंबई येथे होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी मात्र या विमानतळाला स्थानिक लोकनेते ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई येथील विमानतळासाठी ज्या स्थानिकांनी भूमी दिली आहे, त्या नागरिकांना भूमीचा योग्य मोबदला देण्यासाठी स्थानिक नेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांनी मोठा लढा दिला होता. त्यामुळे या विमानतळाला त्यांचे नाव असावे, अशी येथील आगरी-कोळी समाज आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त यांची मागणी आहे. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव देण्याचे आवाहन केले आहे, तर बंजारा समाजाने माजी मुख्यमंत्री ‘वसंतराव नाईक’ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.