छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्वितीय नेतृत्व

२३ जून २०२१ या दिवशी ‘शिवराज्याभिषेकदिन’ आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतर सर्व महापुरुषांपेक्षा एक निराळी गोष्ट घडली आहे. भारतात राजे थोडे झाले नाहीत. जे परंपरेने चालत आलेल्या वाडवडिलांच्या गादीवर बसले त्यांची संख्या तर फार मोठी आहे; पण शिवराय राज्यनिर्माते होते. नल-युधिष्ठिरापासून भोज-विक्रमादित्यापर्यंत अनेक राजे पुण्यश्लोक म्हणून गणले गेले; पण समकालीन आणि उत्तरकालीन समाजाने मोठ्या श्रद्धेने जो राजा ईश्वरी अवतार मानला, असे एकटे छत्रपती शिवाजी महाराजच आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची भूमिका

छत्रपती शिवरायांची भूमिका महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारी नव्हती. ती हिंदवी स्वराज्याची म्हणजे देशवासियांच्या राज्याची होती. सर्व भारतभर कुठेही राज्य निर्माण करता येणे त्यांना जमले असते, तर त्यांनी त्या प्रदेशातील जनतेचे नेते म्हणूनच राज्य केले असते. भारतातील कोणत्याही प्रदेशात त्यांनी स्वतःला जनतेचे प्रतिनिधी आणि तिचे मुक्तीदाते मानले असते. ‘आपण देशवासियांचे राज्य या देशावर व्हावे, या भूमिकेचे समर्थक आहोत’, असे छत्रपतींनी मानले आहे आणि हे राज्यही त्यांनी स्वत:चे न मानता परमेश्वराचे म्हणजेच ‘ही श्रींची इच्छा आहे’, असे मानले. छत्रपती शिवरायांच्या नंतर असामान्य नेता नसतांनाही सर्व जनतेने एखादे राज्य टिकवण्यासाठी इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे. कुणी नेता असो वा नसो, ‘हे माझे राज्य आहे आणि ते मला टिकवलेच पाहिजे’, या जिद्दीने जनता मध्ययुगीन भारताच्या इतिहासात फक्त एकदाच लढली अन् तीही या शिवरायांच्या राज्यासाठी…! भारताच्या इतिहासात बघितल्यास जनतेच्या मनात अशी ज्योत छत्रपती शिवरायांनी प्रथम पेटवली; म्हणून शतकानुशतके लोक त्यांना आपला त्राता, उद्धारकर्ता मानत आले.

राज्याची व्यवस्था करण्याचा अर्थ

वर्ष १६४२ पासून दादोजींच्या नेतृत्वाखाली शिवबांचा कारभार चालू होतो. वर्ष १६४२ ते १६४७ या ५ वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ मावळ ताब्यात घेतले आणि तिथे राज्यव्यवस्था चालू करणे, हा एकच उपक्रम चालू असतांना दिसतो. हा उपक्रम हे खर्‍या अर्थाने शिवरायांच्या राज्यस्थापनेचे बीज आहे. हे बीज समजून घ्यायचे असेल, तर ‘व्यवस्था’ या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

​या कालखंडात छत्रपती शिवरायांचे एक काम चालू होते, ते म्हणजे कौल देऊन गावे बसवण्याचे ! याआधी कित्येक वर्षे राजकीय अंदाधुंदीमुळे सगळा प्रदेश उद्ध्वस्त आणि बेचिराख झालेला होता. तिथे लोक आणून बसवणे, गाव स्थिर करणे, जमीन लागवडीखाली आणणे, लोकांना अभय देणे आणि उजाड भाग पुन्हा एकदा उत्पादक अन् समृद्ध बनवणे, हा व्यवस्थेचा एक भाग आहे; पण हा भाग दिसतो तितका साधा आणि सरळ मुळीच नाही. लोकांना कौल द्यायचा असेल, तर पहिले महत्त्वाचे म्हणजे त्यांना निर्भयपणा वाटला पाहिजे. जमीन नांगरल्यापासून शेत होईपर्यंतचे ६ मास शांतता राहील, याची हमी द्यावी लागते आणि ती लोकांना पटावी लागते. लोकांना पेरण्यासाठी नांगर, बैल, बी-बियाणे देण्यासह त्यांना नवे पीक येईपावेतो जगण्यासाठी धान्य द्यावे लागते. पुढे हा सारा दानधर्म नसून पुढच्या २-३ वर्षांत पुन्हा उत्पन्नातून वळता करून घेण्याचा भाग असल्याने त्यावर कर ठरवावे लागतात, फेरवसुली ठरवावी लागते. हे दोन्ही भाग वजा जाता, जे उरले ते शेतकर्‍यांना वर्षभर पुरण्याजोगे राहील, याची काळजी घ्यावी लागते. शेतीला एक उपद्रव जंगली जनावरांचा असतो. त्यासह शेत, आपण स्वतः, स्वतःची अब्रू आणि वित्त सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करावी लागते. हा थोडक्यात व्यवस्थेचा अर्थ आहे.

अफझलखान वधाचा अर्थ

अफझलखानाला जावळीच्या खोर्‍यात आणायचे आणि त्याला मारायचे, हाच एक केवळ हेतू शिवरायांचा नव्हता; पण त्याला मारणे, हा एका भव्य योजनेतील एक छोटासा भाग होता. वर्ष १६५९ मध्ये खानाचा वध झाला, त्याची सिद्धता शिवरायांच्या चरित्रात वर्ष १६५६ पासून चालू होती. त्याहीपूर्वी वर्ष १६४९ पासून या प्रश्नाची जाण आहे. माणसांची आदिलशाहीजवळ उणीव नव्हती आणि माणूस मारून शिवरायांना फारसा मोठा लाभही नव्हता. शिवरायांची धडपड फौजांच्यानिशी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणून फौजेसह नष्ट करण्याची आणि या युद्धाच्या विजयाचा दूरगामी लष्करी लाभ घेण्याची आहे. त्यात १२ सहस्रांच्या फौजांसह खानाला नष्ट करण्याचे नियोजन होतेच. वर्ष १६५९ मध्ये झालेला अफझलखानाचा वध ही स्थानिक घटना नसून समकालीनांच्याही दृष्टीने ती अखिल भारतीय राजकारणाला हादरा देणारी महत्त्वाची गोष्ट होती. देशातील तत्कालीन सर्व नेत्यांना एक नवे युग आरंभ होत आहे, याचे भान आणून देणारी ही घटना होती. तसेच सर्व अन्यायपीडित जनतेला ‘आपला मुक्तीदाता उदयाला आला आहे’, असा दिलासा देणारी घटना होती.

आत्माहुती आणि बलीदान म्हणजे वीरपुरुषांची जयगाथा !

अफझलखानाचा वध आणि बाजीप्रभु देशपांडे यांची आत्माहुती या तत्कालीन विशाल राजकारणातील एका नाण्याच्या दोन बाजू अन् दोन वेगवेगळ्या पातळीवरच्या जयकथा आहेत. एके ठिकाणी शिवरायांचा जय हा शत्रूच्या नाशामुळे साकार होतो, तर दुसर्‍या ठिकाणी प्रचंड बलीदानाची प्रेरणा आपण जागी केली आहे, हे ते सिद्ध करू शकतात. हा त्या ध्येयवादाचा विजय आहे. आत्माहुती आणि बलीदान यांची कहाणी ही पिढ्यानपिढ्या गायिली जाणारी वीरपुरुषांची जयगाथा असते. छत्रपतींच्या कर्तृत्वामुळे अशा अनेक जयगाथांचा उदय झालेला आहे. बाजीप्रभु, मुरारबाजी, तानाजी मालुसरे असे अनेक जण या जयगाथेची स्वतंत्र प्रकरणे आहेत.

बलीदानाची असामान्य प्रेरणा

अफझलखानानंतर जवळपास ६० सहस्रांहून अधिक फौजा घेऊन मैदानात उतरलेला शास्ताखान हा एक घटक, तर दुसरीकडे ३०-४० सहस्रांचा जमाव घेऊन पन्हाळगड आणि विशाळगड घेऊन बसलेला जिद्दी जोहर असे दोन प्रचंड घटक होते. या राक्षसी शक्तींच्या ओझ्याखाली मराठी राज्य एकदम चुरडले गेले आणि प्रत्यक्ष राजेच शत्रूच्या विळख्यात अडकले ! हा तातडीने अफझलखान वधाचा घडलेला परिणाम आहे. एवढे प्रचंड ओझे राज्यावर असतांनाही प्रदेशातील अनेक भाग जाळून उद्ध्वस्त झाला, तरी जनतेच्या मनातील शिवरायांविषयीची निष्ठा अभंग राहिली. वर्ष १६५९ ला अफझलखानाने जमेल तो प्रदेश २-३ मासांत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. वर्ष १६६० ते १६६३ हाच उद्योग शिवरायांच्या राज्यात शास्ताखानाने चालू ठेवला. वर्ष १६६५ मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांनी नवीन भर घातली आणि नंतर अनुमाने वर्ष १६७० पर्यंत यातील बहुतेक प्रदेश मोगलांच्या कायदेशीर आधिपत्याखाली गेला. यातनांचे एक तप शिवरायांवर निष्ठा ठेवणार्‍या सर्वसामान्य जनतेनेही भोगले आहे. १२ वर्षांच्या विध्वंसानंतर आणि यातनांनंतरही ही सगळी माणसे सर्वसामर्थ्याने शिवरायांच्या बाजूने उभी राहिली. खरेतर त्या मंडळींना शिवरायांनी काय दिले होते ? बाजीप्रभु देशपांडे आणि त्यांच्यासह असणारे २०० ते ३०० लोक एखादी खिंड अडवून ठेवण्यासाठी शेवटचा माणूस मरेपर्यंत लढायचे ठरवतात. माणसे लढतांना मरतात, हे वेगळे; पण ‘आपण मरणार’, याची जाणीवपूर्वक खात्री असतांना अन् केवळ मरण्यासाठीच मरेपर्यंत लढतात, हे एक वेगळेपण आहे. मरणाची प्रेरणा राज्यनिर्मितीतून होत नसते. ज्या ठिकाणी आपल्याला असे दिसते की, एखाद्या माणसाच्या सांगण्यावरून लोक मरण्यास सिद्ध होतात, आपल्या नेत्याने बलीदानाची संधी आपल्याला दिली, यामुळे ते धन्य होतात. त्या ठिकाणी कोणती तरी असामान्य घटना घडत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. ही बलीदानाची प्रेरणा तो नेता जनतेत स्वातंत्र्याची आकांक्षा प्रज्वलित करून ती निर्माण करत असतो.

मनातून उगवणारे सामर्थ्य

मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी वर्ष १६६५ मध्ये छत्रपती शिवरायांनी केलेले तह हा लष्करीदृष्ट्या आपला पूर्ण पराजय झालेला आहे, याची संमती होती. मोगलांची सैनिकी शक्ती शिवरायांच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली, हा या घटनेचा सरळ अर्थ आहे. या पराभवातून शिवराय उठून उभे रहातात ते प्रबळ स्वातंत्र्य आकांक्षेच्या जोरावर ! ते सामर्थ्य तलवारीतून उगवणारे नाही, तर ते मनातून उगवणारे आहे.

​वर्ष १६६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण देशासाठी महत्त्वाची विभूती होती. तिचे सैनिक सामर्थ्य निश्चित ६०-७० सहस्रांहून अधिक होते. तिच्यामागे तेजोवलय होते. हा वाढता मोठेपणा वाढत्या श्रद्धांना कारणीभूत होतो. म्हणूनच असे म्हटले आहे की, आधीची ४-५ वर्षे जाळपोळीत गेली, नंतर प्रचंड पराभव झाला आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आग्याला नजरकैद होतात. ते कधी परत येणार, याची खात्री नाही. अशाही वेळी राज्ययंत्र शिस्तीत चालते, फौजा निष्ठेने उभ्या असतात आणि प्रजा बंड करत नाही, हे सर्व जास्त रोमांचकारी आहे ! शिवरायांनी निर्माण केलेला प्रचंड विश्वास आणि जनतेच्या श्रद्धा जर पाठीशी नसत्या, तर युद्ध कौशल्य येथे व्यर्थ आहे. शिवरायांच्या युद्ध नेतृत्वाला नेहमीच जनतेने व्यापक  पाठिंबा दिला आहे, हे विसरता येणार नाही.

राज्याभिषेकाचा अर्थ

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी धिमेपणाने पुन्हा नव्या उठावाच्या सिद्धतेस आरंभ केला. आपल्या शक्तीची चुणूक दाखवून त्यांनी आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याशी तह केला. त्यांच्याकडून एक ठराविक रक्कम मिळावी, अशी व्यवस्था केली. पुन्हा एक कालखंड व्यवस्थापनाचा, प्रजा रक्षणाचा आणि नव्या उठावाची सिद्धता करण्याचा येतो. या कालखंडात शिवरायांनी आपल्या आरमाराकडे जास्त लक्ष दिले. शांततेचा काळ संपून वर्ष १६६९ अखेर उठावाचा काळ चालू होतो. वर्ष १६७० च्या आरंभापासून उठाव चालू होतो. या उठावात फौजांचा एक भाग दूरवर मोगली मुलुखात लूट करण्यासाठी जातो. या लुटीत वर्‍हाड, औसा, औरंगाबाद, नगर, जुन्नर यांचा समावेश आहे. फौजांचा दुसरा भाग गेलेले किल्ले वेगाने परत घेत असतो, तर तिसरा भाग कोकणात उतरून मोगलांचे तेथील प्रभुत्व संपवून टाकतो.

​मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवतांनाच औरंगजेबाने असे म्हटले आहे, ‘प्रत्यक्ष पादशहांनी जावे, अशी वेळ आलेली आहे; पण त्याऐवजी तुम्हाला पाठवतो.’ आता मिर्झा राजे अस्तित्वात नव्हते. पूर्वीपेक्षा शिवरायांचे सामर्थ्य वाढलेही होते. शांततेची काही वर्षे त्या मुलुखाला मिळालेली होती. दीर्घकालीन युद्धाची पूर्वसिद्धता करण्यास अवधी होता. आता तर शिवरायांवर पादशहांनी स्वतः चालून जाण्याखेरीज दुसरे कोणते उत्तरच संभवत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे या दृष्टीने पाहिले पाहिजे. शिवरायांचा राज्याभिषेक हे सर्व भारतभर पसरलेल्या प्रजेला आपण तुमचे मुक्तीदाता आहोत आणि रक्षणकर्ते आहोत, असे आश्वासन होते. महाराजांच्या राज्याभिषेकाने ‘शिवाजी’ हे आव्हान औरंगजेबाच्या थेट राजधानीत येऊन उभे राहिले.

​जे वर्ष १६४५ मध्ये पुकारले गेले, ते म्हणजे मराठ्यांचे राज्य नव्हे. जे पुरंदरच्या तहातून शेष राहिले, तेही मराठी राज्य नव्हे. राज्याभिषेकाच्या शेवटी जे दिसत होते किंवा शिवरायांच्या मृत्यूच्या दिवशी जे अस्तित्वात होते, तेही मराठी राज्य नव्हे, तर २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शेष राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य ! शिवरायांनी पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापती नसतांना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरू शकली. यात त्यांच्या नेतृत्वाचे खरे यश आहे. शिवरायांचे युद्ध नेतृत्व आणि त्यांनी प्रज्वलित केलेली स्वातंत्र्य आकांक्षा या वेगवेगळ्या गोष्टी नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

छत्रपती शिवराय : युगप्रवर्तक आणि योद्धे नेते

आपल्या सहवासात सामान्य माणसे घेऊन त्यांच्यात दडलेले सुप्त सामर्थ्य विकसित करणे, त्यांच्यातून असामान्य युद्धनेते आणि असामान्य प्रशासक निर्माण करणे, आपल्या ध्येयवादाने भरलेली शेकडो कर्तृत्ववान अन् निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी करणे, हेही युद्ध नेतृत्व आहे; पण त्यासह जिच्या मुक्तीसाठी हा लढा चालू आहे, त्या जनतेला हा लढा आपल्या मुक्ततेचा आहे, याची खात्री पटवून देणे, ती अभंग ठेवणे आणि जनतेची स्वातंत्र्य आकांक्षा प्रज्वलित करून ‘स्वतःचे राज्य निर्माण होते आहे’, अशी नव्या राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणे, हेही युद्ध नेतृत्व आहे. शिवरायांसारखा युगप्रवर्तक नेता ज्या युद्धाचा नेता असतो, ते युद्ध जनतेचे स्वातंत्र्ययुद्ध असते. जनतेच्या स्वातंत्र्ययुद्धाला चौरसपणा, व्यापकपणा आणि शत परिमाणांचा आधार असतो. हे सर्व वैविध्य स्वातंत्र्य आकांक्षेच्या एका सूत्रात गुंफलेले असते.

– प्रा. नरहर कुरूंदकर

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, गोवा २६.६.१९९९)