मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात रस्ता बंद आंदोलन !

महाराणी ताराराणी चौकात रस्ता बंद आंदोलन करणारे कार्यकर्ते

कोल्हापूर, २२ जून – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने २२ जून या दिवशी सकाळी ११ वाजता महाराणी ताराराणी चौकात रस्ता बंद आंदोलन सुमारे एक घंटा करण्यात आले. हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवी टोपी आणि मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. या वेळी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यापुढे आता मूक नाही, तर ठोक मोर्चा निघेल, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘‘सरकार मराठा आरक्षणात ‘टाईमपास’ करत आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ चालू आहे. त्यामुळे केवळ आश्वासन देत वेळ घालवण्यापेक्षा सरकारने आता तातडीने मागण्या मान्य केल्या पाहिजेत.’’ शिवसेनेचे रविकिरण इंगवले, निवास साळोखे, प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, जयेश कदम यांसह अनेकांनी यात सहभाग घेतला. मोर्चामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.