पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका ! – वारकर्‍यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देतांना वारकर्‍यांचे शिष्टमंडळ

मुंबई – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसगाड्यांनी नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्वीकारला असला, तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. त्यामुळे पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका, अशी मागणी वारकर्‍यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन २१ जून या दिवशी राज्यपालांना देण्यात आले. या वेळी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे (पंढरपूर) सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे (त्र्यंबकेश्‍वर) माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय धोंडगे आदी उपस्थित होते.

पायी वारी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, आध्यात्मिक समन्वय आघाडी, भाजप

महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजाम, मोगल आणि इंग्रज यांच्या काळातही खंडित झाली नाही, तिला सलग दुसर्‍या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. सरकारने निर्बंधांसह ५० वारकर्‍यांना पायी वारीला अनुमती द्यावी. आमच्या पालख्यांसह ५० वारकर्‍यांना सुरक्षा देणे सरकारला जमत नसेल, तर त्यांनी केंद्रशासनाकडून सुरक्षा मागवावी.