महाबळेश्‍वर आणि पाचगणी पर्यटकांसाठी खुले

पर्यटकांना रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक

महाबळेश्‍वर आणि पाचगणी पर्यटकांसाठी खुले

सातारा, १९ जून (वार्ता.) – महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्‍वर आणि पाचगणी १९ जूनपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे; मात्र येथे येणार्‍या पर्यटकांची दांडेघर तपासणी नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संगिता राजापूरकर-चौगुले यांनी दिली. महाबळेश्‍वर येथील हिरडा विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील, माजी नगराध्यक्ष डी.एम्. बावळेकर उपस्थित होते.

प्रांताधिकारी संगिता राजापूरकर-चौगुले पुढे म्हणाल्या, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दळणवळण बंदीचे निर्बंध उठवले आहेत. त्यामध्ये महाबळेश्‍वर आणि पाचगणी यांचाही समावेश आहे. पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची गर्दी ओसंडून वहाते. यामुळे ही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पर्यटकांनी रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल जवळ ठेवायचा आहे.

कोरोनाविषयीचे नियम व्यापारी आणि हॉटेलमधील कामगार यांनी कटाक्षाने पाळावेत !


महाबळेश्‍वर आणि पाचगणी येथील दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच व्यापारी आणि हॉटेलमधील कामगार यांची प्रति १० दिवसांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. कोरोनाविषयीचे हे नियम व्यापारी आणि हॉटेल कामगार यांनी कटाक्षाने पाळावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.