उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
कोरोनाचे नियम केवळ सामान्य जनतेसाठीच आहेत का ? असा विचार जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ? या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
पुणे, २० जून – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे १९ जून या दिवशी उद्घाटन झाले. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचाही फज्जा उडाला. पुण्यात सप्ताहाच्या शेवटी दळणवळण बंदीचे कठोर निर्बंध लागू असतांना कोणत्याही नियमाचे पालन या ठिकाणी झाले नाही.
या घटनेवर अजित पवार यांनी सकाळी मी सभा घेणार नसल्याचे सांगितले होते; परंतु मी परत गेलो असतो, तर कार्यकर्तेही नाराज झाले असते. झालेल्या गर्दीविषयी मी पुणेकरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मी शहराध्यक्षांना हा कार्यक्रम साधेपणाने करण्यास सांगितले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे. (उपमुख्यमंत्र्यांनी केवळ दिलगिरी व्यक्त न करता गर्दी करणार्यांवर आणि तिला न रोखणार्यांवर कारवाईही करायला हवी, असेच नागरिकांना वाटते ! – संपादक)
या कार्यक्रमाला येण्याआधी सकाळीच उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले होते. गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात सप्ताहाच्या शेवटी कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली होती. या निर्बंधांची कडक कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. (कोरोना महामारीची महाराष्ट्रातील गंभीर स्थिती पहाता कोणत्याही परिस्थितीत नियम पाळून कृतीतून आदर्श दाखवणारे लोकप्रतिनिधीच जनतेला शिस्त लावू शकतात. – संपादक)