मगोपने क्रांतीदिनी मडगाव येथील लोहिया मैदानात राजकारणात क्रांती घडवण्याचा केला निर्धार

मडगाव, १९ जून (वार्ता.) – मगोपने क्रांतीदिनी मडगाव येथील लोहिया मैदानात राजकारणात क्रांती घडवण्याचा निर्धार केला आहे. याप्रसंगी मगोपचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी ‘गोमंतकियांनी काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना नाकारून मगोपसारख्या स्थानिक राजकीय पक्षांना पाठिंबा द्यावा’, असे आवाहन केले.

आमदार सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या शासनकाळात वर्ष १९७३ मध्ये उद्योग, शिक्षण आणि कृषी या तीनही क्षेत्रांमध्ये क्रांती घडली, तसेच गोव्याचा नियोजनबद्ध विकास झाला. गोमंतकियांना आवाहन आहे की, त्यांनी स्थानिक पक्षांना बहुमताने सत्तेवर आणावे. राष्ट्रीय पक्ष स्थानिकांना नको असलेले प्रकल्प येथे राबवत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मगोप २२ जागा लढवणार आहे, तसेच इतर जागांसंदर्भात पक्ष योग्यवेळी निर्णय घेणार आहे.’’