कंत्राटदाराने महामार्गावर झाडे न लावल्यास ठोकून काढू ! – नितीन गडकरी, मंत्री, केंद्रीय रस्ते विकास

निर्ढावलेल्या कंत्राटदारांना काळ्या सूचीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !

केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी

वर्धा – ‘नागपूर-तुळजापूर या महामार्गाचे काम उत्कृष्ट झाले आहे; मात्र कंत्राटदाराने या महामार्गावर झाडे लावली नाहीत. त्यामुळे त्यांचे देयक रोखण्यास सांगितले आहे. जेव्हा देयक रोखण्यात आले, तेव्हा ८० सहस्र खड्डे खोदण्यात आले; परंतु आता त्यात एकही झाड लावण्यात आलेले नाही. या कारणास्तव रस्त्याचे काम करणार्‍या ‘दिलीप बिल्डकॉन’वर खासदार रामदास तडस यांनी लक्ष ठेवावे. आपण कंत्राटदाराकडून पैसे घेत नाही. त्यामुळे जर तो झाडे लावत नसेल, तर त्याला ठोकून काढू’, अशी चेतावणी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. (कंत्राटदारांनी झाडे लावण्याचे काम त्वरित पूर्ण करावे, हीच जनतेची अपेक्षा आहे. – संपादक) गडकरी यांच्या हस्ते ‘नागपूर-भाग्यनगर (हैदराबाद) महामार्ग ७’वर हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.