आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
बीड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा ताफा आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी अडवला. या वेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. १८ जून या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे बीड जिल्ह्याच्या दौर्यासाठी येथे आले होते. कोरोना संसर्गाच्या काळात आमची कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली; मात्र तीन मासाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरून काढण्यात आले, असा आरोप या वेळी आंदोलकांनी केला.
राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अल्प होत आहे; मात्र बीडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील ३-४ दिवसांपासून प्रतिदिन कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर होते. अचानक गाडी समोर आलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड चालू केली. या वेळी आंदोलकांना गाडीच्या बाजूला हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला; मात्र त्या नंतर परिस्थिती नियंत्रणात आली.