उपाहारगृह चालू करायचे नाही, तर निदान आत्महत्या करायची तरी अनुमती द्या ?

दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक अभिषेक सुर्वे यांची व्यथा !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

रत्नागिरी – कोरोनाच्या संसर्गाला केवळ व्यावसायिकच उत्तरदायी आहेत, असा समज करून प्रशासनाकडून सर्व नियमावली काढण्यात येते, असा आरोप येथील व्यावसायिक करत आहेत. ‘कोरोनाची महामारी चालू झाल्यापासून उपाहारगृहांचा (हॉटेल) व्यवसाय बंद असल्याने हे सर्वजण भिकेकंगाल झाले आहेत. प्रशासनाने आजवर याकडे दुर्लक्ष केले आहे’, असा आरोप रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक अभिषेक सुर्वे यांनी केला आहे.

सुर्वे यांनी पुढे म्हटले आहे की, आम्हीही खाण्याचे म्हणजेच जीवनावश्यक पदार्थच विकतो. रुग्णांना आणि बाहेरून येणार्‍या नागरिकांना आम्ही खाद्य पुरवतो. रस्त्यांवर गर्दी आहे; पण उपाहारगृहामध्ये ४ ग्राहक बसले, तर कोरोना होणार ? यामागे सरकारचे तर्कशास्त्र (लॉजिक) काय आहे? आमच्या वितरण करणार्‍या मुलांना (‘डिलिव्हरी बॉय’ना) देखील त्रास दिला जातो. सरकार उपाहारगृह चालू करायची अनुमती देत नाही, निदान आत्महत्या करायची तरी अनुमती द्या ?