नागपूर येथील पत्रकार परिषदेत ‘आय.एम्.ए.’ची चेतावणी
नागपूर – ‘कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आधुनिक वैद्य रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र काही समाजकंटक हे आधुनिक वैद्यांवरच आक्रमण करतात. त्यामुळे आधुनिक वैद्यांचे मनोधैर्य खचत आहे. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित आक्रमणकर्ते आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात आधुनिक वैद्य उपचार करणार नाहीत’, अशी चेतावणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (‘आय.एम्.ए.’च्या) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी १५ जून या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ‘आधुनिक वैद्य आणि रुग्णालये यांच्यावरील आक्रमणांच्या निषेधार्थ येत्या १८ जून या दिवशी देशभर ‘निषेधदिन’ पाळण्यात येणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,
१. भारतात कोविडच्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या इतर देशांपेक्षा अल्प आहे. हा मृत्यूदर अल्प राखण्यात राजकीय निर्णय, प्रशासकीय कार्यवाही यांसह अधिकचा वाटा हा आरोग्ययंत्रणेचा आहे, हे नाकारून चालणार नाही.
२. आपल्या देशात ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोक खासगी आरोग्य सेवा घेतात. कोविड मृत्यूदर अल्प रहाण्यात खासगी आरोग्ययंत्रणेचा सिंहाचा वाटा आहे; मात्र गेल्या दीड वर्षात आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर आक्रमणे होत आहेत. मध्यंतरी तर नागपूर येथे एका रुग्णालयालाच आग लावण्यात आली.
३. महाराष्ट्रात महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना, वैद्यकीय व्यावसायिक हिंसाचार प्रतिबंध आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा २०१० अस्तित्वात आहे; मात्र गेल्या ११ वर्षांत या कायद्यानुसार शिक्षा झालेल्यांची संख्या अत्यल्प आहे.
४. प्रत्यक्ष निकालपत्रापर्यंत २-३ प्रकरणे गेली; पण शिक्षा कुणालाच झालेली नाही. यावरून या कायद्याची कार्यवाही किती ढिसाळपणे होते, हे लक्षात येते.