आर्वी (वर्धा) शहरातील चिखल हटवण्यासाठी ‘प्रहार सोशल फोरम’च्या वतीने चिखलात लोळत आंदोलन !

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्धा – जिल्ह्यातील आर्वी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गटार योजनेचे काम चालू असल्याने रस्त्यांवर चिखल झाला आहे. सामान्य नागरिकांना ये-जा करतांना त्याचा त्रास होतो. ही परिस्थिती पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करत ‘प्रहार सोशल फोरम’ संघटनेच्या वतीने १६ जून या दिवशी चिखलात लोळत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संघटनेचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक मगर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. या वेळी काळ्या मातीच्या जागी मुरूम रस्त्यावर टाकण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ‘याविषयी योग्य न्याय न मिळाल्यास अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी बाळा जगताप यांनी दिली आहे.