नागपूर येथे केवळ २ मासांत रस्त्यांवर २ सहस्रांहून अधिक खड्डे !

महापालिकेच्या माहितीतून वास्तव उघड

रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये व्यय करूनही ठेकेदारांकडून त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. त्यामुळेच रस्त्यावर खड्डे पडतात; मात्र महापालिका प्रशासन अशा ठेकेदारांवर कोणतीही कठोर कारवाई करत नाही. यात ठेकेदार आणि प्रशासनातील अधिकारी यांचे साटेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो ! सरकारने यात लक्ष घालून हे सर्व थांबवायला हवे !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

नागपूर – कधीकाळी गुळगुळीत रस्त्याचे शहर अशी ओळख असलेले नागपूर शहर सध्या ‘खड्डेयुक्त शहर’ म्हणून ओळखले जात आहे. महापालिकेने बुजवलेल्या खड्ड्यांची माहिती देतांना ‘२ मासांत रस्त्यावर २ सहस्र २६४ खड्डे पडले आहेत’, असे सांगितले आहे. मागील एका वर्षी ही संख्या ६ सहस्र ११५ इतकी होती. हे सर्व खड्डे आता बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

१. रस्ते बांधणी, त्यानंतर पडलेले खड्डे बुजवणे यात महापालिकेचे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये व्यय होतात. सिमेंटच्या रस्त्यांचे प्रतिवर्षी डांबरीकरण करण्यात येते; पण त्यावर एका मासातच खड्डे पडतात. (यावरूनच रस्त्याची गुणवत्ता कशी असेल, याची कल्पना येते ! – संपादक)

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीनुसार रस्त्यावर सर्वाधिक खड्डे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम या मतदारसंघातील आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे; पण अजूनही अनेक रस्त्यांवरील खड्डे तसेच आहेत.