अमरावती येथील जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोरोनाच्या संकटकाळात भ्रष्टाचार केला ! – पप्पू पाटील, जिल्हा संघटक, मनसे

प्रशासनाने आरोपांची पडताळणी करून जिल्हा शल्यचिकित्सक दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, ही अपेक्षा !

( मध्यभागी )पप्पू पाटील

अमरावती – ‘कोरोनामुळे जिल्ह्यात अनेकांचे बळी जात असतांना येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम हे भ्रष्टाचार करण्यात गुंतले आहेत’, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांनी ८ जून या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात त्यांनी डॉ. निकम यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावेही पत्रकारांसमोर सादर केले.

पप्पू पाटील पुढे म्हणाले की,

१. डॉ. शामसुंदर निकम हे ४ वर्षांपासून जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा महिला रुग्णालय प्रमुख आणि ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय प्रमुख अशी ४ पदे सांभाळत आहेत; मात्र त्यांनी या पदांचा अपलाभ घेतला. सर्व देयकांवर प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन्ही स्वाक्षर्‍या एकाच व्यक्तीच्या असतात. यावर जिल्हा कोषागार अधिकारी कवलजीत सिंह यांनी आक्षेप घेत या संदर्भात ३ फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांना पत्राद्वारे कळवले होते.

२. ३१ मे २०२१ या दिवशी सेवानिवृत्त झाल्यावर डॉ. शामसुंदर निकम यांना त्यांच्या सेवेत १ वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. डॉ. निकम यांनी वर्ष २०१७ पासून ते आजपर्यंत अनेक प्रकरणांत भ्रष्टाचार केल्याचे जिल्हा कोषागार अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन कळवले आहे.

३. असे असतांना जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर तक्रारी करणे अपेक्षित होते; मात्र जिल्हाधिकार्‍यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांसमवेत साटेलोटे आहे. डॉ. निकम यांचे गंभीर कृत्य दाबण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार करू.