देहली न्यायालयाची आय.एम्.ए.चे अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना तंबी !

संघटनेच्या व्यासपिठावरून धर्मप्रसार करू नका !

  • जे न्यायालयाने सांगितले, ते आय.एम्.ए.च्या एकाही सदस्याने त्यांच्या अध्यक्षांना का सांगितले नाही ? कि त्यांना डॉ. जयलाल यांचे विधान मान्य होते ?
  • आय.एम्.ए. ही खासगी संघटना आहे आणि तिची स्थापना इंग्रजांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठीच केली होती, म्हणून तिच्या अध्यक्षांना स्वातंत्र्यानंतरही ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासंदर्भात विधाने करण्याची मुभा आहे, असे समजायचे का ?
(उजवीकडे) इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल

नवी देहली – इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना देहलीच्या न्यायालयाने ‘कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी संघटनेच्या व्यासपिठाचा वापर करू नये’, असे निर्देश दिले आहेत. ‘उत्तरदायी अशा अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे बोलण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही’, असेही न्यायालयाने सुनावले आहे. डॉ. जयलाल यांच्याविरोधात ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराची मोहीम चालू केल्याचा आरोप करणार्‍या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अजय गोयल यांनी हा आदेश संमत केला. डॉ. जयलाल यांनी ‘भारतात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे, ही येशूची कृपा आहे’, असे विधान केले होते.

१. न्यायालयाने पुढे म्हटले की, यापुढे भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या तत्त्वांविरुद्ध असलेल्या कोणत्याही कार्यात डॉ. जयलाल यांनी भाग घेऊ नये आणि त्यांच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा राखावी. अध्यक्षपदावर असणार्‍यांकडून कोणत्याही प्रकारची असुरक्षित किंवा सैल टिप्पणी अपेक्षित नसते. आय.एम्.ए. ही एक प्रतिष्ठित संस्था आहे. डॉ. जयलाल यांनी अशा प्रकारच्या कामात भाग घेणार नाही, असे आश्‍वासन दिल्यामुळे आता कोणत्याही इतर आदेशाची आवश्यकता नाही. डॉ. जयलाल कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी आय.एम्.ए.च्या व्यासपिठाचा उपयोग करणार नाहीत आणि वैद्यकीय क्षेत्राच्या कल्याणासाठी अन् वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

२. याचिकाकर्ते रोहित झा यांनी म्हटले आहे, ‘हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यासाठी डॉ. जयलाल हे इंडियन मेडिकल असोसिएशनचा अपलाभ घेत आहेत, त्यांच्या पदाचा गैरवापर करून ते देश आणि येथील नागरिकांची दिशाभूल करत आहेत. कोरोनाकाळाचा वापर करत डॉ. जयलाल यांनी अनेक डॉक्टर, परिचारिका आणि रुग्ण यांच्यामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचे प्रयत्न केले.’ आय.एम्.ए. च्या अध्यक्षांच्या लेखांची आणि मुलाखतींची कात्रणे देत झा यांनी न्यायालयाकडून त्यांना हिंदु धर्म किंवा आयुर्वेद यांची अपकीर्ती करणारी कोणतीही सामग्री लिहिणे, प्रसारमाध्यमांशी बोलणे किंवा लेख प्रकाशित करण्यास मनाई करावी, अशी मागणी केली आहे.