मुंबई, ३ जून – छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर महाराजांची सुटका करण्यासाठी याच किल्ल्यावर प्रयत्न झाला होता. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ल्याच्या विकासाच्या संदर्भात मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्या वेळी मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अतुल बेनके आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.