कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्यशासन उचलणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपून अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी ५ लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून व्यय उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

दोन्ही पालकांचा १ मार्च २०२० या दिवशी किंवा त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असल्यास, एका पालकांचा कोरोनामुळे अन् दुसर्‍या पालकांचा अन्य कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा १ मार्च २०२० पूर्वी मृत्यू झाला असल्यास अन् अन्य पालकांचा त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास अशा ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा या योजनेत समावेश होऊ शकेल. केंद्रशासनाच्या ‘पी.एम्. केअर’ योजनेतून ही योजना राबवण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र शासनाकडूनही ही योजना राबवण्यात येणार आहे. वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ५ लाख रुपयांची ठेव मुलांना व्याजासह मिळेल. बालकांचे संगोपन करण्यास नातेवाईक पुढे आल्यास त्यांना महिला आणि बालविकास विभगाच्या योजनेतून अनुदान देण्यात येईल.