पोप फ्रान्सिस यांनी क्षमायाचना करावी ! – कॅनडाच्या मंत्र्यांची मागणी

कॅनडामधील चर्चच्या शाळेत बिगर ख्रिस्ती मुलांवरील अत्याचारांमुळे मृत्यू झालेल्या २१५ मुलांचे मृतदेह सापडल्याचे प्रकरण

(डावीकडे) कॅरोलिन बेनेट, (उजवीकडे) मार्क मिलर

ओटावा (कॅनडा) – येथील एका कॅथॉलिक चर्चच्या बंद असलेल्या केमलूप्स इंडियन रेसिडेंशियल स्कूलच्या परिसरात नुकतेच २१५ लहान मुलांचे मृतदेह पुरलेले आढळून आले होते. स्थानिक आदिवासी मुले येथे शाळेत शिकत असतांना त्यांच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास करण्यात आलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी कॅनडाच्या सरकारने काही वर्षांपूर्वीच क्षमायाचना केली होती. आता कॅनडाच्या एका मंत्र्यांनी याविषयी पोप फ्रान्सिस यांनी क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी याविषयी आधीच दुःख व्यक्त केले आहे. ही शाळा १९६९ मध्ये बंद झाली होती.

१. कॅनडाचे स्वदेशी सेवा मंत्री मार्क मिलर यांनी म्हटले आहे की, ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे. याविषयी आतापर्यंत क्षमा का मागितली गेली नाही ?

२. अन्य एक मंत्री कॅरोलिन बेनेट यांनी म्हटले की, आम्ही या घटनेविषयी पोप यांची क्षमायाचना ऐकू इच्छित आहोत. अशा क्षमायाचनेमुळे पीडितांच्या नातेवाइकांना दुःखातून  सावरण्यास साहाय्य होईल.