आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकाची हत्या

  • काश्मीरमधून कलम ३७० जरी हटले असले, तरी आतंकवाद अद्याप पूर्वीइतकाच तीव्र स्वरूपात अस्तित्वात आहे, हेच या घटनेवरून स्पष्ट होते ! गेल्या ७४ वर्षांत एका राज्यातील आतंकवादही संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! सरकारने आता तरी आतंकवादाविरुद्ध धडक कृती केली पाहिजे !
  • केंद्रात भाजपची सत्ता असतांना देशभर त्यांचेच नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास्तव सरकारने आता आतंकवादाविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले पाहिजे !
भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता

श्रीनगर – पुलवामा जिल्ह्यातील त्रालमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. राकेश पंडिता हे या परिसरातील भाजपचे मोठे नेते होते.

प्राप्त माहितीनुसार राकेश पंडिता हे २ जूनला सायंकाळी त्यांचा मुलगा ब्रज नाथसमवेत काही कामानिमित्त शेजारी रहाणार्‍या मुश्ताक अहमद यांच्या घरी गेले होते. तेव्हाच आतंकवाद्यांनी अहमद यांच्या घरात घुसून पंडिता यांच्यावर आक्रमण करत त्यांना ठार मारले. पोलिसांनी पंडिता यांना सुरक्षेशिवाय घराबाहेर न पडण्याची चेतावणी दिली होती. या आक्रमणात आसिफा मुश्ताक ही तरुणीही घायाळ झाली आहे. या दोघांना गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारांच्या वेळी राकेश पंडिता यांचा मृत्यू झाला. या आक्रमणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक सैन्यासह घटनास्थळी आले आणि त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. पोलिसांनी शोधमोहीम चालू केली; परंतु हल्लेखोर आतंकवाद्यांचा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही.