सांगली आणि कोल्हापूर येथील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेस धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर – सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकत्याच आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत मार्गदर्शन करत होत्या. शिबिराचा उद्देश समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले. या वेळी समितीचे श्री. संतोष देसाई यांनी हिंदु राष्ट्र संघटकासाठी आवश्यक गुण कोणते असावेत आणि त्याची आचारसंहिता कोणती असावी, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हिंदु राष्ट्र संघटकाने नेतृत्वासमवेत त्यांचे वक्तृत्वही विकसित करावे ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक
हिंदु राष्ट्र संघटकाने नेतृत्व विकसित करण्यासह त्यांनी वक्तृत्वही विकसित केले पाहिजे. यासाठी आपण केवळ माध्यम असून कर्ता करविता तो सर्वसाक्षी परमेश्वरच आहे, याची जाणीव आपण क्षणोक्षणी ठेवली पाहिजे.
काळानुसार ‘ऑनलाईन’ उपक्रमात झोकून देऊन सहभागी व्हा ! – किरण दुसे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
गतवर्षी दळणवळण बंदी झाल्यावर सर्व व्यवहार ठप्प झाले. याही स्थितीत हिंदु जनजागृती समितीने राष्ट्र-धर्मकार्य पुढे नेण्यासाठी ‘ऑनलाईन’ उपक्रमांना प्रारंभ केला. या ‘ऑनलाईन’ उपक्रमांना हिंदूंचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात मुख्यत्वेकरून आठवड्यातून २ वेळा होणार्या चर्चासत्रांमध्ये देशातील विविध मान्यवरांचा सहभाग असतो. या चर्चासत्राद्वारे विविध विषयांना वाचा फोडून ते तडीस नेण्याचा प्रयत्न असतो. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून अनेक जण साधनेला प्रवृत्त झाले. दळणवळण बंदीमुळे भाविकांना आज मंदिरात जाता येत नाही; मात्र ‘ऑनलाईन’ पद्धतीने आयोजित केलेल्या हनुमान जयंती आणि रामनवमी सोहळ्याद्वारे भाविकांना तो अनुभवता आला. त्यामुळे काळानुसार ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे महत्त्व समजून घेऊन त्यात झोकून देऊन सहभागी व्हा.
धर्मप्रेमींचे अभिप्रायसौ. वैशाली माने – सद्गुरूंचे स्मरण सतत ठेवून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालले पाहिजे. त्यांच्याप्रती आपण सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या साधनेसंदर्भातील सर्व गोष्टी आपण मनापासून केल्या पाहिजेत. श्री. रामभाऊ मेथे, कोल्हापूर – ‘मला ‘भारतरत्न’ मिळाला नाही तरी चालेल; परंतु मला ‘हिंदु राष्ट्र संघटक’ मानले, तरी माझ्या जीवनाचे सार्थक होईल’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाटत होते. त्यामुळे मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आपत्काळातही हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत सहभागी होता येणे, ही आमच्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. श्री. दयानंद पाटील, चंदगड, कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज नेहमी कुलदेवतेची उपासना करत होते. यातून आणि या कार्यशाळेतून साधनेचे काय महत्त्व आहे, हेच यातून लक्षात आले. श्री. अभिनंदन भोसले, निपाणी – समितीने घेतलेला हा उपक्रम ‘भगवान श्रीकृष्णाचे जेथे अस्तित्व आहे, तेथे विजय नक्की आहे’, या वचनाप्रमाणे आहे. या धर्मयुद्धात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ही भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आहे, तर आम्ही अर्जुनाच्या रूपात आहोत. त्यामुळे विजय हा श्रीकृष्णाच्याच बाजूने होणार आहे. वर्षा देसाई – कार्यशाळेतील मार्गदर्शनामुळे समाजात आणि नातेवाइकांमध्ये प्रसार केला पाहिजे, याविषयीचा आत्मविश्वास निर्माण झाला. |