दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याकडून निषेध !

कुबेर यांनी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद लिखाण केल्याचे प्रकरण

( डावीकडून गिरीश कुबेर आणि नारायण राणे )

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद लिखाण केले आहे, असा आरोप ट्वीटद्वारे करत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी त्यांचा जाहीर निषेध केला आहे. ‘कुणाच्या जिवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले ?, याची माहिती समजली पाहिजे’, असेही राणे यांनी म्हटले आहे.

राणे यांनी पुढे म्हटले आहे की, गिरीश कुबेर यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख झाले आहे. गिरीश कुबेर, तुम्ही मर्यादा सोडून लेखन केले आहे. त्यामुळे मराठा समाज तुम्हाला क्षमा करणार नाही.

असे पुस्तक लिहिणार्‍याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही ! – खासदार संभाजीराजे

संभाजीराजे

खासदार संभाजीराजे यांनी ‘कुबेर यांच्या या पुस्तकावर राज्यात तात्काळ बंदी घालावी’, अशी मागणी केली आहे. ‘अशा प्रकारचे लिखाण आपण कसे काय खपवून घेतो ? सरकारने या पुस्तकावर आजपर्यंत बंदी कशी आणली नाही ? असे पुस्तक लिहिणार्‍याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही’, असेही त्यांनी म्हटले.