दुर्धर आजारामुळे मरणप्राय वेदना सहन करतांना ‘गुरुस्मरण, गुरुध्यान आणि गुरुभक्ती’ या त्रिसूत्रींचे पालन करून गुरुकृपेची अखंड अनुभूती घेत संतपदावर विराजमान झालेले पू. डॉ. नंदकिशोर वेद !

डावीकडून डॉ. नंदकिशोर वेद, सौ. मिथिलेश कुमारी, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.)अंजली गाडगीळ, मध्यभागी कु. आनंदिता (नात), श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सौ. कनुप्रिया श्रीवास्तव (डॉ. नंदकिशोर वेद यांची मोठी मुलगी) (वर्ष २०१९)

१. वेदकाकांची परात्पर गुरु डॉक्टरांवरील अनन्य श्रद्धा आणि त्यामुळे सुसह्य झालेले त्यांचे आजारपण

१ अ. ‘रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर)’ झाल्याचे निदान झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे शब्द आठवून शांत आणि स्थिर होणे : ‘डिसेंबर २०१९ मध्ये प्रकृती ठीक नसल्याने डॉ. नंदकिशोर वेदकाका अयोध्येहून रामनाथी आश्रमात वास्तव्याला आले. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या रक्ताची चाचणी केल्यावर त्यांना ‘रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर)’ झाल्याचे निदान झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘प्रारब्धभोग भोगूनच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे आहे’, हे शब्द आठवून ते शांत आणि स्थिर झाले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१ आ. गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा असलेल्या वेदकाकांनी कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही अखंड आणि भावपूर्ण साधना करणे : वेदकाकांना असह्य वेदना होत. एरव्ही व्यक्तीला थोडेसे जरी दुखत असले, तरी ती अस्वस्थ होते, चिडचिड करते; पण गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा असलेल्या वेदकाकांनी या आजारातही अखंड आणि भावपूर्ण साधना केली. ‘गुरुस्मरण, गुरुध्यान आणि गुरुभक्ती’ या बळावर स्थिर राहून ते प्रारब्धभोग भोगू लागले. ते अखंड गुरुमाऊलीच्या अनुसंधानातच असायचे. ते गुरुमाऊलीला आर्ततेने आळवून आणि शरणागत होऊन हाक मारायचेे. अशी आर्ततेने हाक मारल्यावर ती हाक दयाळू गुरुमाऊलीपर्यंत पोचणार नाही का ? गुरुमाऊलीच्या कृपेमुळे वेदकाकांना होणार्‍या मरणप्राय वेदनांची तीव्रता उणावत असे.

१ इ. मृत्यू डोळ्यांना दिसत असतांनाही अखंड गुरुस्मरणात रहाणार्‍या वेदकाकांच्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व असणे : अध्यात्माची तात्त्विक माहिती असणे, प्रकृती स्वस्थ असतांना साधना करणे, हे वेगळे आणि तीव्र वेदना सहन करत असतांना, मृत्यू डोळ्यांना दिसत असतांना साधना अन् गुरुचरणांचे अखंड स्मरण करणे वेगळे ! अशा स्थितीतही वेदकाका वेगवेगळे भावप्रयोग करून भावावस्थेत रहायचे. त्यांच्या मनात सतत गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असायचा. त्यामुळेच त्यांनी केलेल्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेदकाका इतके आनंदात असायचे की, त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘ते आजारी आहेत’, असे वाटायचेही नाही. जणू गुरुभक्तीमुळे त्यांच्याभोवती एक कवच निर्माण झाले होते.

२. वेदकाकांचा देहत्याग आणि त्यांच्या देहात अन् कक्षात चैतन्याच्या स्तरावर झालेले पालट

२ अ. अत्यवस्थ स्थितीतील वेदकाकांना पहातांना ‘ते ईश्‍वराच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवणे : ११.५.२०२१ या दिवशी वेदकाकांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे मी त्यांना भेटायला आश्रमातील त्यांच्या निवासकक्षात गेले. त्या वेळी त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत होता. काही वेळाने त्यांचा श्‍वास एका लयीत होऊ लागला. त्यांच्याकडे पहातांना ‘ते ईश्‍वराच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते आणि त्यांतून कृतज्ञताभाव प्रकट होत होता.

२ आ. ‘मृत्यूसमयी वेदकाकांच्या देहात चैतन्याच्या स्तरावर पालट होणे, हे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे द्योतक आहे’, असे वाटणे : मृत्यूसमयी डॉ. वेद यांच्या पायाच्या पोटरीच्या भागावरील त्वचेला पिवळसर छटा आली होती, तसेच त्यांची त्वचा अत्यंत मृदू अन् पारदर्शक झाली होती. मृत्यूसमयी त्यांच्या देहात चैतन्याच्या स्तरावर झालेले पालट पाहिल्यावर ‘आजारपणातही त्यांनी चांगल्या प्रकारे साधना केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे हे द्योतक आहे’, असे मला वाटले.

२ इ. डॉ. वेदकाकांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती : ११.५.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.५६ वाजता वेदकाकांनी देहत्याग केला. काही वेळाने मी त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा मला त्यांच्या मुखावर हास्य दिसले. त्यांच्या कक्षातील प्रकाश पुष्कळ वाढला होता आणि तेथे सुगंध येत होता.

३. डॉ. नंदकिशोर वेदकाका संतपदी विराजमान होणे

३ अ. आश्रमात राहिल्यामुळे प्रारब्धभोगाची तीव्रता न्यून होणे आणि वेदकाकांनी केलेल्या भावपूर्ण साधनेमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होऊन आध्यात्मिक पातळी ७१ टक्के होणे : मागील दीड वर्षापासून वेदकाका रामनाथी आश्रमात रहात होते. आश्रमात राहिल्यामुळे त्यांच्या प्रारब्धभोगाची तीव्रता न्यून झाली, तसेच त्यांनी अखंड अन् तळमळीने साधना केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नतीही झपाट्याने झाली. ‘शेवटचा दीस गोड व्हावा’, अशी प्रत्येक ईश्‍वरभक्ताची इच्छा असते. वेदकाकांच्या आयुष्यातील शेवटचा दिवसही गोड ठरला. मृत्यूच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्क्यांवरून ६९ टक्के झाली. मृत्यूनंतरही त्यांची प्रगती जलद गतीने होऊन या १२ दिवसांत त्यांची आध्यात्मिक पातळी आणखी २ टक्क्यांनी वाढली आणि आज ते आता संतपदावर विराजमान झाले आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे घडलेली ही एक अलौकिक घटना आहे.

​वेदकाकांच्या संदर्भात ‘गुरुस्मरण’ हेच औषध रामबाण, करून घेतली प्रगती विहंगम ।’, असे म्हणावे लागेल.

​धन्य ते पू. डॉ. नंदकिशोर वेदकाका, ज्यांनी ‘अत्यवस्थ स्थितीतही साधना कशी करता येते ?’, हे आपल्या उदाहरणातून साधकांना शिकवले आणि धन्य ते परात्पर गुरु डॉक्टर, ज्यांनी पू. डॉ. वेदकाका यांच्यासारखे संतरत्न घडवले !

​सनातनला उत्तमोत्तम संतरत्ने प्रदान करणार्‍या विष्णुस्वरूप परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी शरणागतभावाने नमस्कार आणि कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२१.५.२०२१)


साधनेची तीव्र तळमळ आणि ईश्‍वरावर दृढ श्रद्धा असल्याने दुर्धर आजारातही भावपूर्ण साधना करून ‘सनातनचे १०७ वे (समष्टी) संतपद’ प्राप्त करणारे अयोध्या येथील पू. डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) !

हा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/479218.html