पिंपरी – कोरोनाची तिसरी लाट आल्यास महापालिका प्रशासनाने लहान मुलांकरिता वाय.सी.एम्. रुग्णालयामध्ये १५० ऑक्सिजन बेड, ३० आयसीयू बेड आणि जिजामाता रुग्णालयात १५० खाटांची व्यवस्था केली आहे. तसेच जिजामाता रुग्णालयामध्ये मुलांसमवेत आईला रहाता येईल, अशी व्यवस्था केल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. जुलैनंतर तिसरी लाट येण्याचा तज्ञांचा अंदाज असून त्यादृष्टीने सिद्धता चालू आहे. त्याविषयी आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राजेश पाटील पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा पर्याय आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड संयुक्तपणे जागतिक निविदा काढण्यासंदर्भात विचार चालू आहे. लवकरच निविदा काढण्यात येईल. तिसर्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता धरून उपचारासाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. आवश्यकतेनुसार शहरातील १५० बालरोग तज्ञांची सेवा अधिग्रहित केली जाईल. तसेच शहरात ठिकठिकाणी जाऊन जनजागृती केली जाईल.’’