मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून खंडपिठाचे सलग साडेबारा घंटे कामकाज

८० प्रकरणांवर सुनावणी !

सद्यःस्थितीत देशभरातील न्यायालयांत लाखो प्रकरणे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अधिकाधिक वेळ कामकाज करून न्यायदान करणार्‍या खंडपिठाची कृती अनुकरणीय आहे. प्रलंबित खटल्यांविषयी न्यायालय आणि केंद्रशासन यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांचा निपटारा केल्यास खर्‍या अर्थाने ‘न्यायदान’ ही संकल्पना सार्थकी ठरेल !

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपिठाने १९ मे या दिवशी सलग साडेबारा घंटे कामकाज केले. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या अध्यक्षतेखाली या खंडपिठाचे सकाळी १०.४५ वाजता चालू केलेले कामकाज रात्री ११.१५ वाजता संपले.

या कालावधीत एकूण ८० प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली. न्यायालयीन सुनावणीचे काम अधिकाधिक वेळ करण्यासाठी न्यायमूर्ती काथावाला चर्चेत आहेत. मे २०१८ मध्ये न्यायमूर्ती काथावाला यांनी न थांबता एकाच दिवशी १२० प्रकरणांवर सुनावणी केली होती.