राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी सर्रासपणे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करतात. नेतेमंडळी जेव्हा स्वत: नियमांचे काटेकोरपणे पालन करतील, तेव्हा जनतेला आवाहन करण्याची आणि न्यायालयाला ‘नियम पाळा’, असे सांगण्याची वेळच येणार नाही.
मुंबई – कोणताही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. असे असतांनाही कार्यक्रम होत आहेत. अशा राजकीय पुढार्यांमुळेच कोरोनाचा प्रसार होणार नाही का ? या नेतेमंडळींवर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने केला आहे. कारवाई न होण्यामागे पोलीस आणि नेतेमंडळी यांचे काही साटेलोटे आहे का ? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही राजकीय पुढार्याने कोणताही कार्यक्रम करू नये, यासाठी आता आम्हालाच आदेश काढावा लागेल.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका नेत्याच्या एका कार्यक्रमात कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले नाही, याविषयी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मत नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनीच मास्क घातलाच नव्हता. आमदार स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाविषयक नियम पाळू इच्छित नाहीत. प्रत्येकाने स्वत:ला थोडी शिस्त लावायला हवी. प्रत्येकाने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे; मात्र काही राजकारण्यांकडूनच या नियमावलीचे उल्लंघन होणे, हे दुर्दैवी आहे.