समाजद्रोह्यांची काळीकृत्ये !

कोरोनाकाळात्त मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांची विकृत मानसिकता प्रतिदिन समोर येत आहे. ‘कर्नाटक राज्य प्रशासन बेंगळुरू शहरातील कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे’, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला अन् नेहमीप्रमाणे झोपा काढत असलेल्या सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. या ‘खाट घोटाळ्या’ची व्याप्ती बरीच मोठी आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणार्‍या व्यक्तीच्या नावाने खाट आरक्षित करून नंतर १२ घंट्यांनी लाच घेऊन कोरोना रुग्णांना ती दिली जात. गेल्या ७-८ दिवसांत अशा प्रकारची ४ सहस्र ६५ प्रकरणे समोर आली. येथे प्रश्न असा पडतो की, एवढे होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? कि त्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली ?, याचा सरकारने शोध घेतला पाहिजे.

देहली येथेही नुकतेच अग्नीशमन दलाच्या सिलिंडरचे ऑक्सिजनच्या सिलिंडरमध्ये रूपांतर करणारी टोळी जेरबंद करण्यात आली. ही टोळी १ सिलिंडर तब्बल १३ सहस्र रुपयांचा विकत होती ! एकूणच वाईट प्रवृत्तीच्या लोकांची विकृत मानसिकता पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. आताही खासदार सूर्या यांनी जर हा भ्रष्टाचार उघडकीस आणला नसता, तर ही समाजद्रोही टोळी जनतेला लूटत राहिली असती. सूर्या यांनी आवाज उठवल्यानंतर एका दिवसात तब्बल ३ सहस्र २१० खाटा रिकाम्या झाल्या ! विशेष म्हणजे त्याच्या आदल्या दिवसापर्यंत रुग्णालयांत कुठेही एकही खाट शिल्लक नव्हती. हे कुठेतरी थांबले पाहिजे. सरकारने अशा घटना गांभीर्याने घेऊन दोषींना तात्काळ कठोरात कठोर शासन केले पाहिजे. एकीकडे सरकारी यंत्रणा कोरोनाविषयी गंभीर असल्याचे वारंवार सांगतात; पण प्रतिदिन कुठे ना कुठे असे घोटाळे होऊनही त्याकडे दुलर्क्ष का करतात ? हे अनाकलनीय आहे. खरे तर अशा स्वार्थी, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील समाजद्रोह्यांची जागा कारागृहातच आहे. त्यांनाच नव्हे, तर या साखळीत जे जे असतील त्या सर्वांना जरब बसेल, अशी कारवाई त्यांच्यावर जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडत रहातील आणि सर्वसामान्य नागरिक भरडत राहील. हे चित्र सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे. सरकारने अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करणे, हाही कोरोनाविरोधातील जनतेसाठी दिलेला एकप्रकारचा लढाच ठरेल !