आशादायी पाऊल !

केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्रामुळे कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर अभ्यास चालू केला असल्याची बातमी वाचणेसुद्धा आनंददायी आहे. यावर संशोधन करण्यासाठी सरकारकडून हृषिकेश येथील ‘एम्स्’ रुग्णालयाला ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या भयंकर रूप धारण केलेल्या कोरोना महामारीमुळे प्रतिदिन सहस्रो रुग्ण दगावत आहेत. वाढती रुग्णसंख्या प्रतिदिन नवा विक्रम रचत आहे. कुठे रुग्णालयांत रुग्णांची परवड होत आहे, तर कुठे स्मशानभूमीच्या बाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. म्हणजे जीवंतपणीच नव्हे, तर मेल्यावरही कोरोना पाठ सोडतांना दिसत नाही. अशा स्थितीत लोकांसाठी गायत्री मंत्र हा वरदान ठरू शकतो. आपला देश आध्यात्मिक असल्याने येथील बहुतांशी हिंदू भक्तीमार्गी आहेत. त्यातही गायत्री मंत्राची उपासना करणारे तर कोट्यवधींच्या घरात असावेत. या सर्वांसाठीसुद्धा हे संशोधन विशेष आनंददायी आणि आशादायी म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने या संशोधनाची कृतीही चालू केली आहे. या संशोधनासाठी कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या २० जणांची निवड केली जाणार आहे. यांपैकी एका गटावर नेहमीचे वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत, तर दुसर्‍या गटाला नेहमीच्या उपचारांसमवेत आयुर्वेदीय औषधे, गायत्री मंत्राचे पठण आणि योगासने करायला सांगितली जाणार आहेत. याचा तुलनात्मक अभ्यास करून ‘दोन्ही गटांच्या रुग्णांवर दोन्ही उपचारपद्धतींचे काय परिणाम झाले ?’ हे पडताळले जाईल. हे संशोधन साधारण २ ते ३ मास चालेल. त्यानंतर निष्कर्ष हाती येतील. ‘एम्स्’मध्ये पल्मोनोलॉजिस्ट आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. रूची दुआ यांनी यासाठी पुढकार घेतला आहे. वास्तविक कोरोना महामारी चालू होऊन दीड वर्ष होत आले. तेव्हाच हे संशोधन व्हायला हवे होते. ते झाले असते, तर एव्हाना ठोस निष्कर्षाप्रत पोचता आले असते. असे असले तरी आता विलंबाने का होईना सरकारने त्या दिशेने पावले उचलली, हेही नसे थोडके. अशा प्रकारचे संशोधन पहिलेच आहे असे नाही, तर यापूर्वीही ‘देवावर श्रद्धा असणार्‍या आस्तिक रुग्णांचे आजारातून बरे होण्याचे प्रमाण इतर रुग्णांपेक्षा अधिक आहे’, असे अनेक संशोधनांतून समोर आलेले आहे. यातून अध्यात्माची शक्ती प्रतीत होते.

अध्यात्माची ही शक्ती हल्ली विज्ञानाच्या आधारे सिद्ध करून दाखवावी लागते, तरच बुद्धीवाद्यांना ती पटते; परंतु आपल्याकडील कोट्यवधी भाविकांची देवावर मूळातच श्रद्धा असल्याने त्यांना विज्ञानाच्या आधारे अध्यात्माची शक्ती सिद्ध करून दाखवण्याची किंवा पटवून देण्याची आवश्यकता भासत नाही. अध्यात्म जसे परिपूर्ण शास्त्र आहे, तसे विज्ञान नाही. तरीही असे अपूर्ण शास्त्र परिपूर्ण शास्त्राची चिकित्सा करते, हे चमत्कारिकच आहे ! देवाप्रती भाव अधिक असेल, तर अनुभूती लवकर येतात. हे लक्षात घेता ज्या रुग्णांना नेहमीच्या उपचारपद्धतींसह गायत्री मंत्राचे पठण करायला सांगितले जाणार आहे, त्यांनी ते श्रद्धेने करणे आवश्यक आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ‘कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करेल’, असे विधान केले. एवढेच नव्हे, तर ‘कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सुस्वर रामचरितमानसचे पठण करणे हेही वरदान ठरू शकते’, असेही त्यांनी सांगितले. एकूणच ‘कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात आता लोकांचा ओढा अध्यात्माकडे वळत चालला आहे’, हे सांगायला कुठल्या संशोधनाची आवश्यकता नाही !