कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर !
पू. वैद्य विनय नीळकंठ भावे यांचा परिचय
पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीच्या ‘श्री अनंतानंद औषधालय’ या आयुर्वेदाच्या औषध निर्मिती आस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट औषधे बनवून अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. पू. वैद्य विनय भावे हे सनातनचे संत आहेत.
सदर औषधांसह शासनाने प्राधिकृत केलेली वैद्यकीय चिकित्सा आणि औषधे घेणे टाळू नये. अन्य सर्व उपाययोजना पाळाव्यात, तसेच स्थळ, काळ आणि प्रकृती यांनुसार चिकित्सेत पालट होऊ शकतो. त्यामुळे योग्य त्या वैद्यांचा सल्लाही घ्यावा.
१. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरता येण्यासारखी औषधे
१ अ. संशमनी वटी : ‘यामध्ये गुळवेल, लोह भस्म, अभ्रक भस्म आणि सुवर्ण माक्षिक भस्म ही घटकद्रव्ये असतात. सर्व शरिराला रोगाविरुद्ध लढण्यासाठी बळ देणारे हे औषध कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र वापरले जात आहे. ताप येऊ नये म्हणून, ताप येत असतांना, तसेच तापानंतर येणारा अशक्तपणा घालवण्यासाठी या औषधाचा उपयोग होतो. काविळीमुळे येणार्या अशक्तपणामध्येही याचा उपयोग होतो. हे औषध मलेरिया तापातही लाभदायक ठरते. काहीजण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुळवेल घनवटी घेतात. संशमनी वटी घेतल्यास गुळवेल घनवटी घेण्याची आवश्यकता नाही. संशमनी वटी ही गुळवेल घनवटीपेक्षा तुलनेने जास्त परिणामकारक आहे.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : १ ते २ गोळ्या दिवसातून २ किंवा ३ वेळा (साथीच्या तीव्रतेनुसार) (१५ दिवसांसाठी ३० ते ९० गोळ्या)
आपल्या भागात साथीचा ताप आलेले रुग्ण असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साथ असेपर्यंत नियमित हे औषध घेता येते. हे शक्तीवर्धक औषध असल्याने याच्या नेहमीच्या वापराने काही हानी होत नाही.
१ आ. महासुदर्शन वटी : याची माहिती पुढे दिली आहे.
गोळीचे वजन : ३०० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून २ वेळा
१ इ. शृंगाराभ्र रस : हे औषध फुप्फुस आणि हृदय यांची क्षमता वाढवणारे आहे. या अवयवांची कार्यक्षमता, तसेच रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या औषधाचा उपयोग होतो.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून २ वेळा (१५ दिवसांसाठी ३० गोळ्या) हे औषध १५ दिवस घेऊन नंतर बंद केले, तरी चालते.
१ ई. गंधर्व हरीतकी वटी : या औषधामुळे पोट साफ होते आणि शरिरातील आम (न पचलेले अन्न) बाहेर निघून जायला साहाय्य होते.
गोळीचे वजन : ३०० मिलिग्रॅम
मात्रा : २ ते ३ गोळ्या रात्री झोपतांना आठवड्यातून २ वेळा (१५ दिवसांसाठी ४ ते १२ गोळ्या)
२. कोरोनाच्या विविध लक्षणांमध्ये उपयुक्त औषधे
ही औषधे ती ती विशिष्ट लक्षणे असतांना वापरावीत.
२ अ. तालीसादि चूर्ण : खोकला, घशात कफ येणे, घशाची खवखव होणे, घशात टोचल्यासारखे होणे या लक्षणांमध्ये हे चूर्ण वापरता येते. या औषधात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह असणार्या व्यक्तींनी हे औषध न घेता पर्यायी औषध घ्यावे.
मात्रा : दिवसातून २ – ३ वेळा १ चहाचा चमचा (३ ग्रॅम) चूर्ण चघळून खावे किंवा १ चहाचा चमचा चूर्ण २ चमचे मधात चांगले मिसळून त्यातील थोडे थोडे मिश्रण वारंवार चाटावे. (१५ दिवसांसाठी ९० ते १३५ ग्रॅम)
२ आ. चंद्रामृत रस : या औषधामध्ये अभ्रक भस्मासारखी श्वसनसंस्थेला बळ देणारी घटकद्रव्ये असतात. हे औषध खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे या लक्षणांमध्ये उपयुक्त आहे.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : २ – २ गोळ्या दिवसातून २ – ३ वेळा चघळून खाव्यात. (१५ दिवसांसाठी ६० ते ९० गोळ्या)
२ इ. शृंगाराभ्र रस : दम लागणे, फुप्फुसांची क्षमता न्यून झाल्याने प्राणवायूची पातळी घटणे, खोकला या लक्षणांमध्ये, तसेच फुप्फुस आणि हृदय यांना बळ देण्यासाठी या औषधाचा उपयोग होतो. हे रोगाच्या मध्यम ते तीव्र अवस्थेत वापरण्या सारखे औषध आहे.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : २ – २ गोळ्या दिवसातून ३ वेळा (१५ दिवसांसाठी ९० गोळ्या)
२ ई. सुवर्ण मालिनी वसंत : या औषधामध्ये सुवर्ण भस्म असते. आयुर्वेदानुसार सुवर्ण हे उत्तम विषहारक (म्हणजे शरिरात जंतूंमुळे निर्माण होणारी विषारे नष्ट करणारे) आहे. सुवर्ण मालिनी वसंत या औषधाच्या सेवनाने श्वसनसंस्था आणि आतडी, तसेच कटीच्या (कंबरेच्या) भागातील अवयवांना बळ प्राप्त होते. साथीच्या रोगांच्या तीव्र अवस्थांमध्ये जेव्हा विषाणूंचा प्रभाव पुष्कळ वाढतो, अशा वेळीही या औषधाचा चांगला उपयोग झाल्याची उदाहरणे आहेत. या औषधामुळे आत्यंतिक अवस्थेमध्ये गेलेले रुग्णही बरे झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे हे आयुर्वेदातील एक ‘जीवनरक्षक’ (लाईफ सेव्हिंग) औषध आहे. या औषधामुळेही प्राणवायूची पातळी वाढण्यास साहाय्य होते.
गोळीचे वजन : अनुमाने १०० मिलिग्रॅम
मात्रा : रोगाच्या तीव्रतेनुसार १ – १ गोळी दिवसातून १ ते ३ वेळा. गोळीचे चूर्ण करून ते चमचाभर मधात नीट मिसळून चघळावे. बेशुद्ध अवस्थेतील रुग्णांच्या ओठांच्या आतील बाजूस, तसेच हिरड्यांवर लावावे. अनेक वैद्य हे औषध कोरोनाच्या आरंभीच्या काळात १ गोळी दिवसातून २ ते ३ वेळा घेण्यास सांगतात. रोगाची तीव्रता अल्प झाल्यावर प्रमाण अल्प करून दिवसाला १ गोळी एवढे करावे. रोगातून बरे झाल्यावर पुढे ५ ते १५ दिवस दिवसाला १ गोळी याप्रमाणे हे औषध घ्यावे. हे औषध कोरोना असल्याचे चाचणीतून लक्षात आल्यावर लगेच चालू केले, तर पुढचा धोका टाळण्यास साहाय्य होते. (१५ दिवसांसाठी ३० ते ४५ गोळ्या)
२ उ. महालक्ष्मी विलास रस : हे ही एक सुवर्णयुक्त औषध आहे. हे औषध हृदय आणि फुप्फुस यांना बळ देणारे अन् शरिराचे ओज (तेज) वाढवणारे आहे. हे प्राणवायूची पातळी वाढवण्यास साहाय्यक आहे. रोगाच्या मध्यम आणि तीव्र या अवस्थांमध्येहे वापरावे.
गोळीचे वजन : अनुमाने १०० मिलिग्रॅम
मात्रा : सुवर्ण मालिनी वसंत या औषधाच्या मात्रेप्रमाणे (१५ दिवसांसाठी ३० ते ४५ गोळ्या)
२ ऊ. त्रिभुवनकीर्ती रस : हे औषध कफनाशक आणि ताप घालवणारे आहे.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून ३ वेळा मध किंवा आल्याच्या रसातून घ्यावी. ताप उतरत नसल्यास प्रत्येक ३ घंट्यांनी १ गोळी घ्यावी. (एकूण ६० ते ८० गोळ्या)
२ ए. रसपाचक वटी : हे औषध शरिरातील रस या धातूची शुद्धी करणारे आहे. सतत येणारा आणि न उतरणारा ताप हा बहुतेक वेळा रस धातूच्या दुष्टीमुळे (मलिनतेमुळे) येत असतो. कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही वेळा रक्तात गाठी होणे, हे लक्षण आढळते. हे औषध रक्तात गाठी होण्यापासून प्रतिबंध करण्यास साहाय्य करते.
गोळीचे वजन : ३०० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून ३ वेळा. (१५ दिवसांसाठी ४५ गोळ्या)
हे औषध पेठेत (बाजारात) न मिळाल्यास याची घटकद्रव्ये आयुर्वेदाची चूर्णे मिळणार्या दुकानामध्ये मिळू शकतात. ती घटकद्रव्ये (चूर्णे) अशी आहेत – इंद्रयव, पटोल आणि कुटकी. ही चूर्णे प्रत्येकी २० ग्रॅम एकत्र मिसळून त्यातील २ चिमूट औषध या औषधाच्या गोळी ऐवजी घ्यावे.
२ ऐ. महासुदर्शन वटी : हे तापावरील एक चांगले औषध आहे. याच्या योगाने पित्त न्यून होते. यकृत वाढले असल्यास ते न्यून होण्यासही याचा लाभ होतो. हे अत्यंत कडू असल्यामुळे काहींना रक्तातील साखर, तसेच लठ्ठपणा न्यून होण्यासाठी याचा उपयोग झाल्याची उदाहरणे आहेत.
गोळीचे वजन : ३०० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून ३ वेळा. (१५ दिवसांसाठी ४५ गोळ्या)
या औषधाच्या गोळ्या न मिळाल्यास महासुदर्शन चूर्ण हे औषध पेठेत मिळते. हे ५० ग्रॅम प्रमाणात आणून यातील २ चिमूट औषध या औषधाच्या गोळीऐवजी घ्यावे.
२ ओ. जयमंगल रस : हे एक सुवर्णयुक्त जीवनरक्षक (लाईफ सेव्हिंग) औषध असून १०३ अंश फेरन्हाईटपेक्षा जास्त तीव्रतापांमध्ये उपयुक्त आहे.
गोळीचे वजन : अनुमाने १०० मिलिग्रॅम
मात्रा : तीव्र ताप असेल, तेव्हा १ – १ गोळी दिवसातून २ ते ३ वेळा. (एकूण ५ गोळ्या) काही वेळा कोणतेही औषध देऊन ताप उतरत नाही. अशा वेळी काही वैद्य रुग्णाला १ ते २ चमचे एरंडेल तेल देऊन वर गरम पाणी पिण्यास देतात. यामुळे २ – ३ वेळा पातळ शौचाला होते आणि ताप उतरतो, असा काही वैद्यांचा अनुभव आहे. यानंतर जयमंगल रस हे औषध दिल्यास ताप पुन्हा येण्याची शक्यता न्यून होते. पातळ शौचाला होत असतांना शक्तीक्षय होऊ नये, यासाठी गरम पाणी पीत रहावे. आवश्यकता वाटल्यास पाण्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालावी. २ – ३ वेळा पातळ शौचाला होऊन भूक लागल्यावर तूप आणि मीठ घालून गरम गरम पातळ भात (मऊ भात) जेवावा.
३. कोरोना होऊन गेल्यावर शरिराची झीज भरून येण्यासाठी उपयुक्त औषधे
कोरोनाची लक्षणे निघून गेल्यावर पुढे १५ दिवस ते १ मास ही औषधे घ्यावीत.
३ अ. लक्ष्मी विलास गुटी : हे औषध रोगामुळे क्षीण झालेले हृदय आणि फुप्फुस यांना बळ देणारे आहे. याच्या योगाने शुक्रधातू (वीर्य) आणि ओज (तेज) वाढते. छातीत धडधडणे न्यून होते.
गोळीचे वजन : १२५ मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून २ किंवा ३ वेळा.
(१५ दिवसांसाठी ३० ते ४५ गोळ्या)
३ आ. प्रभाकर वटी : हे औषध रक्तवर्धक, तसेच हृदय आणि फुप्फुस यांना बळ देणारे आहे.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून २ किंवा ३ वेळा.
(१५ दिवसांसाठी ३० ते ४५ गोळ्या)
३ इ. सारिवादी वटी : हे औषध रक्त शुद्ध करणारे आणि सर्व अवयवांना बळ देणारे, तसेच उष्णता न्यून करणारे आहे. मासिकपाळीच्या वेळी जास्त किंवा जास्त दिवस रक्तस्राव होत असल्यास, तसेच गर्भाशयाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. याऔषधाचा विशेष उपयोग कानांच्या विकारांमध्ये (उदा. कान वाहणे, कानामध्ये सतत भुंग्याच्या गुणगुणण्याप्रमाणे आवाज येत रहाणे) होतो.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून २ वेळा. (१५ दिवसांसाठी ३० गोळ्या)
३ ई. नित्यानंद रस : रक्ताच्या गाठी होऊ नये, म्हणून हे औषध उपयोगी पडते.
गोळीचे वजन : २५० मिलिग्रॅम
मात्रा : १ – १ गोळी दिवसातून २ वेळा. (१५ दिवसांसाठी ३० गोळ्या)
४. काही सूचना
अ. वरील सर्व औषधे ३ ते ७ वयोगटातील मुलांना पाव प्रमाणात, तर ८ ते १४ या वयोगटातील मुलांना अर्ध्या प्रमाणात द्यावीत.
आ. शक्यतो सर्व औषधे चघळून खावीत. यामुळे त्यांची परिणामकारकता वाढते.
इ. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी औषध मधासह न घेता पाण्यातून घ्यावे.
ई. येथे दिलेली औषधे अत्यंत सुरक्षित आणि दुष्परिणाम विरहित आहेत. आजकाल काही लोक ‘धातूंची भस्मे असलेल्या आयुर्वेदीय औषधांमुळे मूत्रपिंड किंवा यकृत खराब होते’, असा अपप्रचार करतात. यामुळे बरेच आधुनिक वैद्य त्यांच्या रुग्णांना आयुर्वेदाची औषधे घेऊ नका, असे सांगतात. ‘शास्त्रीय पद्धतीने केलेल्या कोणत्याही धातूंच्या भस्मांमुळे मूत्रपिंड किंवा यकृत खराब होते, असे म्हणणे’, हा निवळ अपप्रचार आहे. याला शास्त्रीय आधार नाही.
उ. येथे दिलेली बहुतेक औषधे पेठेत (बाजारात) बैद्यनाथ या आस्थापनाची मिळतात. कोणत्याही आस्थापनाची औषधे घेण्यास आडकाठी नाही.
ऊ. येथे दिलेली औषधे ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी औषधे चालू असतांना घेण्यास आडकाठी नाही. केवळ अन्य पॅथीतील औषधे आणि आयुर्वेदाची औषधे यांमध्ये न्यूनतम १५ मिनिटांचे अंतर ठेवावे. औषधे शक्य असल्यास रिकाम्या पोटी घ्यावीत; पण तसे शक्य नसल्यास खाऊन घेतली, तरी चालतील.
ए. हे सर्व लेखन लोक कल्याणाच्या हेतूने करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, वैद्य आदी उपलब्ध नसतांना लोकांचे प्राण वाचवता यावेत, हा यामागील उद्देश आहे. लोकांना डॉक्टर किंवा वैद्य यांच्याकडे न जाता स्वतःच्या मनाने औषधे घेण्यास प्रेरित करण्यासाठी हे लेखन केलेले नाही.
ऐ. एखाद्या वैद्याकडे कोरोना संदर्भातील आयुर्वेदाचे उपचार चालू असतील किंवा आपण नियमित एखाद्या वैद्यांचे औषध घेतअसाल, तर येथे दिलेली औषधे घेण्यापूर्वी त्यांना विचारावे.
ओ. औषधे जास्त काळासाठी घ्यायची झाल्यास, तसेच या लेखाच्या संदर्भात काही शंका असल्यास आयुर्वेदाचे उपचार करणार्या स्थानिक वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे.’
सारांश
– (पू.) वैद्य विनय नीळकंठ भावे, मोर्डे, ता. संगमेश्वर, रत्नागिरी. (४.५.२०२१)