उंब्रज परिसरात (जिल्हा सातारा) अनावश्यक फिरणार्‍या नागरिकांच्या गाड्या पोलिसांकडून कह्यात


सातारा, ६ मे (वार्ता.) – संचारबंदी असूनही अनावश्यकपणे घराबाहेर पडणार्‍या नागरिकांच्या गाड्या कह्यात घेण्याची मोहीम उंब्रज (जिल्हा सातारा) पोलिसांच्या वतीने राबवण्यात येत आहे. उंब्रज, मसूर, तारळे आणि चाफळ या पोलीस ठाण्यांच्या आवारात  जप्त केलेल्या अनेक दुचाकी गाड्या पडून आहेत.

उंब्रज पंचक्रोशीतल चाफळ फाटा, बाजारपेठ रस्ता, चोरे रस्ता, अंधारवाडी याठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. अनावश्यक कारणाविना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस नागरिकांना करत आहेत. तरीही नागरिक काही ना काही कारणाने घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे उंब्रज पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले आहे.