संपूर्ण भारतीय जनता पक्ष बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

कोल्हापूर येथे निदर्शने करतांना चंद्रकांत पाटील (मध्यभागी) आणि अन्य कार्यकर्ते

कोल्हापूर, ५ मे (वार्ता.) – बंगालमध्ये ज्यांचे लोकांना सुरक्षित ठेवण्याचे दायित्व आहे, तेच राज्यकर्ते हिंसाचार करत आहेत. अमानवी कृत्य करून तृणमूलचे कार्यकर्ते त्याठिकाणी अराजकता माजवत आहेत. त्यामुळे बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांना आजच्या आंदोलनातून आम्ही विश्‍वास देत आहोत की, आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या हिंसाचारात ज्या कार्यकर्त्यांची घरे लुटण्यात आली, व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या, अशा सर्वांना पुन्हा उभे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष निश्‍चितच करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

मिरज येथे निदर्शने करतांना भाजप कार्यकर्ते

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ५ मे या दिवशी त्यांच्या निवासस्थानी फलक हाती धरून घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी त्यांच्या त्यांच्या दारातून अशा प्रकारची निदर्शने केली.

सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत निदर्शने

सांगली येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करतांना आमदार गाडगीळ (मध्यभागी), तसेच अन्य कार्यकर्ते

सांगली – पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी संघटक सरचिटणीस दीपक माने, युवामोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, सचिव विश्‍वजित पाटील, अतुल माने, श्रीकांत वाघमोडे, सतीश खंडागळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज येथे भाजप नगरसेवक निरंजन आवटी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

बंगालमधील हिंसाचाराची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या ! – माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर

लातूर – बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर केलेल्या हिंसाचारात भाजपच्या २८ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. स्वत:ला पुरोगामी म्हणणार्‍या बंगालच्या सत्ताधार्‍यांकडून अशी घटना घडणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया लातूर येथील माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांनी या घटनेची नोंद घेत बंगालमधील सरकार विसर्जित करून तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या आक्रमणाचा सोलापूर शहरात ठिकठिकाणी निषेध !

सोलापूर शहरात निषेध आंदोलन करतांना भाजप कार्यकर्ते

सोलापूर – पश्‍चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या आक्रमणाचा सोलापूर शहरात ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. शहरातील दाजी पेठ येथे ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम, आनंद बिर्रु, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण येमुल उपस्थित होते. हातात फलक आणि निषेधाच्या घोषणा देऊन कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करत भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या घरासमोर हे आंदोलन केले.