जनतेचा पैसा अनाठायी व्यय करणे गंभीर आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित तडीस न्यावे, ही अपेक्षा !
पिंपरी – दुसर्या लाटेमध्ये कोरोना विषाणूचा जोर वाढत आहे. दिवसाला शेकडो नागरिकांचे प्राण जात आहेत; मात्र नागरिकांना मृत्यूच्या खाईत लोटून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची खरेदी करत आहेत. पिंपरी चिंचवड येथील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असून रुग्णांसाठी खाटाही उपलब्ध होत नाहीत. महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या ३ नवीन इमारती उपकरणाअभावी पडून आहेत. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी प्रशासनावर दबाव आणून अवास्तव कामांवर कोट्यवधी रुपयांचा व्यय करत आहेत. त्यामुळे या काळात केलेल्या खरेदीची आणि खरेदी करण्याचे आदेश दिलेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून शिकत असतांना १६ माध्यमिक शाळांमध्ये साडेचार कोटींचा खर्च करून सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी सव्वा कोटींची खरेदी केली आहे. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी.टी. गणवेश, रेनकोट, दप्तर, स्वेटर, बूट खरेदी केले आहेत, तर विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगले रहाण्यासाठी शाळेच्या आवारात ‘ओपन जिम’ उभारण्यासाठी शिक्षण प्रशासन अधिकार्यांनी आदेश दिले आहेत. शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ‘वॉटर फिल्टर’ खरेदीवर अडीच कोटींचा व्यय केला आहे. अंगणवाडी आणि बालवाडी बंद असतांना मुलांना स्वच्छता किटचे वाटप करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.