स्थानांतर केल्यामुळेच परमबीर सिंह यांचे खोटेनाटे आरोप ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

नागपूर – रिलायन्स इंडस्ट्रिज्चे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण यांत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अन् पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद होती, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केला. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून स्थानांतर केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर चुका क्षमा करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. त्याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए) करत आहे. यासाठी त्यांचे मुंबई आयुक्त पदावरून स्थानांतर केले होते, तसेच एका कार्यक्रमात या संदर्भात मी जाहीर वक्तव्यही केले होते. त्याच्या रागापोटी त्यांचे स्थानांतर केल्यानंतर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप नाही. परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा नोंद केला आहे.