न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या अधिकार्‍यांना कारागृहात टाकल्याने नाही, तर काम केल्याने ऑक्सिजन मिळेल !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले !

नवी देहली – केंद्र सरकारचे दायित्व आहे की, त्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. पालन न करणार्‍या अधिकार्‍यांना कारागृहात टाका. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्यावरून कारवाई करावी लागेल; मात्र अधिकार्‍यांना कारागृहात टाकल्याने रुग्णांना ऑक्सिजन मिळणार नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देहलीला ऑक्सिजनच्या  तुटवड्यावरून फटकारले. देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या देहलीतील ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितले होते. या नोटिसीच्या विरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.

१. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले की, तुम्ही देहलीला किती ऑक्सिजन दिले ? तुम्ही देहली उच्च न्यायालयात असे कसे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला देहलीला ७०० मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचा आदेश दिलेला नाही ?

२. केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की, एप्रिल मासामध्ये ऑक्सिजनची आवश्यता अधिक नव्हती; मात्र ती अचानक वाढली. देहलीला ४५० मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे.

३. त्यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही तुम्हाला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचा आदेश दिला होता आणि त्यापासून आम्ही माघार घेऊ शकत नाही. त्यापेक्षा अल्प आम्हाला मान्य नाही.

४. न्यायालयाने म्हटले की, हा राष्ट्रीय आपत्काळ आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. केंद्र सरकार काम करत आहे; मात्र तरीही तुटवडा असल्याने तुमची योजना आम्हाला सांगा.

५. न्यायालयाने सांगितले की, केंद्र सरकारचे काम केवळ अनुमानावर चालू आहे. प्रत्येक राज्याची, जिल्ह्याची स्थिती वेगवेगळी असू शकते. त्यामुळेच एकच फुटपट्टी (निकष) सर्वांना लावू शकत नाही. देहलीची स्थिती वाईट आहे. तुम्ही सकाळ, दुपार आणि सायंकाळी माहिती गोळा केली पाहिजे. कोणत्या रुग्णालयाला किती ऑक्सिजन मिळत आहे, याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. तुम्ही मागील ३ दिवसांत काय केले, हे सांगा. १० मे या दिवशी पुढील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने काय सिद्धता केली, याचा आम्ही आढावा घेऊ. तसेच ७०० मेट्रिक  टन ऑक्सिजन देण्यासाठी तुम्ही काय केले, हेही सांगा.

देहलीने मुंबई महानगरपालिकेकडून शिकावे !

मुंबई महानगरपालिकेने कोरोना संकटकाळाच उत्तम काम केले आहे, देहलीने त्याच्याकडून काही शिकले पाहिजे, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले.