बेंगळुरू येथील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी लाच घेऊन दिल्या जात आहेत खाटा ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्य प्रशासन शहरात कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे.

(सौजन्य: Republic World )

सूर्या यांनी आरोप करतांना म्हटले की, बेंगळुरू महानगरपालिकेचे अधिकारी, बाहेरील दलाल, कोविड वॉर रूम आणि कॉल सेंटरमधील प्रमुख हा घोटाळा करत आहेत. या रुग्णालयामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणार्‍या व्यक्तीच्या नावाने खाट आरक्षित करून ठेवली जाते आणि नंतर १२ घंट्यांनी लाच घेऊन कोरोना रुग्णाला दिली जाते. गेल्या ७-८ दिवसांत अशा प्रकारची ४ सहस्र ६५ प्रकरणे समोर आली आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यांनी त्यांच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी रुग्णालयांच्या संगणकातील ‘डेटा’चे विश्‍लेषण करण्यास सांगितले. ‘रुग्णांना ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतरही तेथे खाटा कशा उपलब्ध नाहीत ?’ असा प्रश्‍न सूर्या यांनी विचारला.

तेजस्वी सूर्या यांना चर्चेसाठी बोलावले आहे ! – मुख्यमंत्री येडियुरप्पा

कर्नाटकचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी म्हटले की, तेजस्वी सूर्या यांनी मोठा घोटाळा उघड केला आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना बोलावले आहे.

बेंगळुरू महापालिकेच्या कोविड वॉर रूममध्ये एकाच समुदायाचे लोक का ? – तेजस्वी सूर्या यांचा प्रश्‍न

बेंगळुरू – येथील महानगरपालिकाच्या कोविड वॉररूममध्ये मुसलमान सदस्यांची नियुक्ती केल्यावरून भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या वेळी टीका केली. त्यांनी  ‘कोविड वॉररूम’साठी नेमणूक करण्यात आलेल्या १७ लोकांच्या सूचीतील नावे वाचून दाखवली. त्या सूचीत केवळ एकाच समुदायाच्या लोकांची नावे पाहून त्यांनी आक्षेप घेतला. या वेळी आमदार रवि सुब्रह्मण्यम्, सतीश रेड्डी आणि उदय गरुडाचार यांनीही याला दुजोरा दिला.

१. सूर्या यांनी विचारले की, हे सर्व कोण आहेत ?, त्यांची नेमणूक करण्यासाठी कोणते मापदंड लावले ? त्यांची कुणी नेमणूक केली ? त्या यंत्रणावाल्यांना बोलवा.

२. आमदार रवि सुब्रह्मण्यम् यांची विचारले की, या नेमणुका मदरशासाठी केल्या आहेत कि महानगरपालिकेसाठी ?

३. आमदार सतीश रेड्डी यांनी ‘हे सोडून तुम्हाला इतर कुणी मिळाले नाहीत का?’, असा प्रश्‍न विचारला.