वाराणसी – आयुर्वेदाचे चिकित्साशास्त्र केवळ आयुष काढ्यापर्यंतच मर्यादित नसून त्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य आहे, अशी माहिती येथील काशी हिंदु विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद संस्थेतील रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना विभाग, चिकित्सा विज्ञान संस्था यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. सामान्यत: कतिपय आयुर्वेदिक चिकित्सक आणि जनमानस यांनी संपूर्ण प्राचीन शास्त्रीय आयुर्वेदाच्या चिकित्साशास्त्राला आयुष काढ्यापर्यंत मर्यादित ठेवले आहे. समाजातील सुशिक्षित वर्गामध्येही असाच अपसमज आहे. त्यामुळे सध्याच्या विश्वव्यापी कोविड महामारीमध्ये सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या आयुर्वेदाच्या चिकित्साशास्त्राकडे दुर्लक्षित करण्यात आले आहे.
२. वास्तविक आयुर्वेदाच्या चिकित्सेमुळेे कोविड आजारावर लाक्षणिक चिकित्सा करता येऊ शकते. श्वसन, खोेकला आणि प्राणवत संस्थेच्या आजारांवरील उपचारांसाठी चरक संहिता, सुश्रृत संहिता आणि अष्टांग हृदय आदी ग्रंथांमध्ये माहिती दिली आहे. ही सर्व माहिती कोविडसाठीही अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
३. आयुर्वेदाच्या रसशास्त्रामध्ये अनेक रस, रसायन अत्यंत शास्त्रीय तर्कयुक्त प्रमाणांसह विकसित करण्यात आली आहेत, जी आजच्या महामारीमध्ये उपयुक्त सिद्ध होऊ शकतात. यात प्रामुख्याने स्वर्णभस्माचा योग-स्वर्ण मालिनी वसंत, अभ्रक भस्म, प्रवाळ भस्माचे अनेक योग, त्रैलोक्य चिंतामणी रस, जयमंगल रस, त्रिभुवन कीर्ती रस, लक्ष्मीविलास रस इत्यादी अनेक योग रस, तसेच रत्ना, समुच्चय, रस तरगिनी आणि रसामृत आदी रस यांचे शास्त्रीय चिकित्सकीय ग्रंथांमध्ये अत्यंत सम्यक रूपामध्ये वर्णन केले आहे.
४. भारतातील अनेक प्रतिष्ठित आयुर्वेदिक चिकित्सक वरील वर्णन केलेल्या रस रसायनांच्या माध्यमातून या महामारीची लाक्षणिक चिकित्सा करून रोेग्यांना रोगमुक्त करण्यात यशस्वी होत आहेत.
५. आम्हाला अत्यंत नम्रतेने म्हणायचे आहे की, अॅलोपॅथीच्या माध्यमातून या महामारीवर उपचार करण्यात येत आहेतच; परंतु अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधील कोणतीही संशोधन संस्था अद्याप या महामारीवर १०० टक्के प्रभावी औषध विकसित करू शकलेली नाही. या चिकित्साशास्त्रामध्येही विदेशात विकसित करण्यात आलेल्या औषधांच्या साहाय्याने लाक्षणिक चिकित्सा करून मानवतेची सतत कौतुकास्पद सेवा करण्यात येत आहे.