नवी मुंबई, २ मे (वार्ता.) – सध्या सर्वच ठिकाणाहून ऑक्सिजनची मागणी वाढली असून ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात ‘ऑक्सिजन वॉर रूम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली ६ जणांचे पथक कार्यरत आहे. येथून सकाळी ७ ते ११ या वेळेत महानगरपालिका आणि खासगी अशा सर्व कोविड रुग्णालयीन सुविधेतील ऑक्सिजनच्या साठ्याचा प्रति ३ घंट्यांनी आढावा घेतला जात आहे. तसेच कुठे अडचण असल्यास उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची माहिती घेऊन ती दूर करण्यासाठी तत्परतेने आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे.
पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया चालू !
याशिवाय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता तत्परतेने पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प उभारण्यासाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटर, नेरूळ येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय आणि एम्.जी.एम्. रुग्णालय, कामोठे या ठिकाणी आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स खाटांची सुविधा कार्यान्वित आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर, राधास्वामी सत्संग आणि एक्पोर्ट हाऊस या ठिकाणी असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्येही ऑक्सिजन खाटांसाठी ऑक्सिजन पुरवठा केला जातो.
महापालिका क्षेत्रात २६ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात असून तेथील ऑक्सिजन पुरवठ्यावरही महानगरपालिकेच्या वतीने कायम लक्ष ठेवले जात आहे.
सर्व क्षेत्रीय अधिकार्यांनी रुग्णालयांमध्ये किमान २४ घंटे पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा कायम उपलब्ध करून ठेवण्यासाठी रुग्णालयीन व्यवस्थापनाशी नियमित संपर्क ठेवावा, त्यात अडचणी येत असल्यास ऑक्सिजन वॉर रूमशी संपर्क साधून ऑक्सिजनची पूर्तता करून घेईपर्यंत पाठपुरावा करावा, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.