साधना आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळे प्रत्येक प्रसंगाला स्थिरतेने सामोरे जाणार्‍या डोंबिवली, ठाणे येथील कै. सौ. प्रतिमा प्रकाश राऊत (वय ५० वर्षे) !

कै. सौ. प्रतिमा प्रकाश राऊत

सनातन संस्थेच्या डोंबिवली येथील साधिका सौ. प्रतिमा प्रकाश राऊत (वय ५० वर्षे) यांचे १७.४.२०२१ या दिवशी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. २९.४.२०२१ हा त्यांचा निधनानंतरचा १४ वा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे यजमान श्री. प्रकाश राऊत यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. प्रतिकूल काळातही स्थिर रहाणे

१ अ. पत्नीला कामाच्या ठिकाणी पुष्कळ त्रास होऊनही तिने तो चिकाटीने सहन करणे : ‘माझी पत्नी एका खासगी अधिकोषात नोकरी करत होती. तिथे तिला कामगार संघटनांचे नेते आणि इतर सहकारी यांच्याकडून मानसिक त्रास होत असे; पण तिने कधीही माघार घेतली नाही.

१ आ. जलद लोकलगाडी पकडतांना पत्नीच्या हातातून रक्त येऊ लागल्यावर तिने तत्परतेने प्रथमोपचार करून घेणे : एकदा दादरला दुपारच्या वेळी पत्नी जलद लोकलगाडी पकडत होती. त्या वेळी ‘ब्लेड’ने पाकीट मारणार्‍या व्यक्तीचे ‘ब्लेड’ तिच्या हाताला लागले आणि हातातून रक्त यायला लागले. गाडीत चढल्यावर शेजारच्या महिलेने ‘रक्तस्राव होत आहे’, हे सांगितले. तेव्हा पत्नीने गाडीतून उतरून फलाट क्रमांक ४ वरून फलाट क्रमांक ६ वरील प्रथमोपचार विभागात जाऊन प्रथमोपचार करून घेतला. त्यानंतर ती घरी आली. साधना आणि प.पू. गुरुदेवांची कृपा यांमुळेच या प्रसंगी ती स्थिर राहू शकली.

१ इ. दम्याचा त्रास बळावल्यावर पत्नीने स्थिर राहून उपचार करायला लावणे : अनेक वेळा मला अ‍ॅलर्जीमुळे उद्भवणार्‍या दम्यामुळे ‘मी मरतो का जगतो’, असे व्हायचे; परंतु अशा वेळी पत्नी स्थिर राहून मला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जायची आणि उपचार करायला लावायची. त्याविषयी मला तिच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायची.

२. देवाच्या कृपेने पत्नीचे आजारपण आणि तिच्या मृत्यूचे कटू वास्तव स्वीकारता येणे

२ अ. पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ती अल्पायुषी असल्याचे लक्षात येऊन कठीण परिस्थिती स्वीकारण्याची मनाची सिद्धता होणे : पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने तिला रुग्णालयात भरती करावे लागले. तिची ‘सिटी स्कॅन’ ही तपासणी करण्यासाठी २ दिवस लागले, तर त्याचा अहवाल यायला एक दिवस लागला. त्यानंतर तिचा आजार वाढतच गेला. कोणत्याच उपचारांचा तिच्यावर काहीच सकारात्मक परिणाम होतांना दिसत नव्हते. तेव्हा आमच्या लक्षात आले की, तिचे आयुष्य एवढेच आहे. त्यामुळे देवाच्या कृपेने कठीण परिस्थिती स्वीकारण्याची माझ्या मनाची सिद्धता झाली.

मृत्यूपूर्वी शेवटचे अडीच दिवस तिच्याकडे पाहिल्यावर ‘ती शांत आणि निर्विचारपणे झोपली आहे’, असे मला जाणवायचे. तेव्हा ‘देवाने तिच्या मनातील आशा आणि सर्व इच्छा नष्ट केल्या आहेत’, असे मला वाटत होते. अंतिम क्षणी तिच्या मनात नातेवाइकांच्या भेटीमुळे मायेचे विचार येऊन ती भावनाप्रधान होऊन मायेत अडकू शकली असती; मात्र ‘तिला मायेपासून दूर ठेवून गुरुदेवांनी तिच्यावर कृपा केली’, असे मला जाणवले.

२ आ. ‘पत्नीचे निधन झाले’, हे समजल्यावर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भ्रमणभाष येणे अन् ‘देवाने कठीण प्रसंग सहन करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून शक्ती दिली’, असे अनुभवणे : ‘पत्नीचे निधन झाले’, हे समजल्यावर काही वेळातच सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भ्रमणभाष आला. त्यानंतर माझ्या मनाची स्थिरता वाढली. रुग्णालयातील सर्व गोष्टी आणि अंत्यविधी पूर्ण करून घरी यायला साधारण ८ घंटे लागले. या संपूर्ण कालावधीमध्ये माझ्या डोळ्यांत एकदाही अश्रू आले नाहीत किंवा माझ्या भावनांचा उद्रेक झाला नाही. त्या वेळी माझ्या समवेत मोठा मुलगा अनुराग होता. तोही अत्यंत धिराने वागत होता. तेव्हा हा कठीण प्रसंग सहन करण्यासाठी ‘देवाने सद्गुरूंच्या माध्यमातून आम्हाला शक्ती दिली आहे’, हे मी अनुभवले.

दहाव्या दिवशी गुरुदेवांच्या अखंड स्मरणात राहून सर्व विधी व्यवस्थित पार पडले.

‘हे परम दयाळू गुरुमाऊली, केवळ तुमच्या कृपेमुळेच या कठीण प्रसंगी आम्हाला स्थिर रहाता आले. तुम्हीच आम्हाला आत्मबळ दिलेत, याविषयी आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. प्रकाश राऊत, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२७.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक