जेवढी सेवा तेवढेच शुल्क आकारण्याची सातारा जिल्हा पालक संघाची मागणी !

सातारा – कोरोना काळात शाळा बंद असूनही वार्षिक शुल्क आकारणीसाठी शाळा व्यवस्थापन पालकांच्या मागे तगादा लावत होते. याविषयी सातारा जिल्हा पालक संघाने सातत्याने लढा दिल्याने खासगी शाळा चालकांचे धाबे दणाणले होते. संघाच्या दणक्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांनी किती सेवा दिली याविषयी माहिती मागवली आहे. जेवढी सेवा तेवढेच शुल्क या मागणीवर सातारा जिल्हा पालक संघ ठाम असल्याने शिक्षण विभागाने पालक संघाकडून कल दिल्यास खासगी शिक्षण क्षेत्रातील मनमानी कारभाराला चाप लागणार आहे, असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविषयी २२ मार्च या दिवशी सातारा जिल्हा पालक संघाकडून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच ३० मार्च या दिवशी स्मरणपत्रही देण्यात आले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील निवडक शाळा, शिक्षण विभाग आणि पालक संघ यांची बैठक घेतली. या बैठकीत पालक संघाने होत असलेल्या अन्यायाच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सिंह यांनी इंग्रजी शाळा घेत असलेल्या शुल्काचे ब्रेक अप (शुल्क आकारण्याचे टप्पे) मागितले; परंतु जागच्या जागी कोणतीही शाळा देऊ शकली नाही. त्यामुळे बैठक नंतर घेण्याचे ठरले. पुढे दळणवळण बंदीमुळे बैठक होऊ शकली नाही.

मधल्या काळात काही शाळांनी १० टक्के शुल्क सवलत जाहीर करून पालकांना आमीष दाखवले. तसेच पालकांना दबावाखाली ठेवत शुल्क देण्याविषयी तगादा लावला. पालकांनी या तक्रारी पालक संघापर्यंत नेल्या. संघाने शाळांचा दबाव झुगारून पुन्हा जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाकडे दाद मागितली. त्यामुळे जिल्हाधिकारी सिंह यांनी खासगी शाळांना चाप लावत शुल्काच्या ब्रेक अपची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी याविषयी पाठपुरावा घेण्याचेही आदेशात नमूद केले.