नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने संबंधित अधिकार्यांंची बैठक घेत महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या कोविड केंद्रांसह सर्व खासगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक येथील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर लगेचच विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात लागलेल्या आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील ४ दिवसांत महानगरपालिकेच्या कोविड केंद्रांसह सर्व खासगी रुग्णालयांची तिन्ही ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या-त्या क्षेत्रातील अनुभवी तज्ञ व्यक्तींकडून हे ऑडिट करून घेतले जाणार असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ञांचेही साहाय्य घेतले जाणार आहे.