अमेरिकेचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीला आवश्यक कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार

  • अमेरिकेने भारताची विनंती फेटाळली !

  • भारतीय लसींच्या उत्पादनावर संकट

अमेरिका भारताचा मित्र असल्याचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र संकटाच्या काळात जो साहाय्य करतो, तोच खरा मित्र असतो. अमेरिकेने दाखवलेला हा कृतघ्नपणा पहाता अमेरिका भारताचा खरा मित्र होऊ शकत नाही, हे भारतियांनी कायमचे लक्षात ठेवावे !

डावीकडून भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

 

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही भारताची विनंती मान्य करण्याआधी आमच्या नागरिकांना अधिक प्राथमिकता देणार आहोत. अमेरिकी नागरिकांविषयी आमचे विशेष दायित्व आहे, असे सांगत अमेरिकेने कोरोना लस बनवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्यात याविषयी चर्चा झाली होती.

त्यानंतर अमेरिका सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा भारतीय अधिकार्‍यांनी व्यक्त केली होती. ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अदार पुनावाला यांनी देखील बायडन यांना ट्वीट करून विनंती केली होती.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अमेरिकी नागरिकांचे लसीकरण होणे हे केवळ अमेरिकेच्या नव्हे, तर संपूर्ण जगाच्या हिताचे आहे. आमच्यावर अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षितेचे दायित्व आहे. दुसरे म्हणजे अमेरिकेत कोरोना बळींची संख्या जगात सर्वाधिक आहे.

अमेरिकेचा कृतघ्नपणा !

गेल्या वर्षी अमेरिकेत कोरोनाची भीषण लाट आली असतांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले ‘हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन’ हे औषध भारताने  अमेरिकेला निर्यात केले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला भारताने प्रतिसाद दिला होता. भारताने माणुसकीच्या भावनेतून अमेरिकेला साहाय्य केले होते; मात्र आता भारत अडचणीत असतांना अमेरिकेने कृतघ्नपणा दाखवला आहे.