ऑक्सिजनचा पुरवठा अल्प करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नागपूर खंडपिठाकडून रहित !

नागपूर – भिलाई स्टील प्लांटमधून शहराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने केंद्र सरकारला २२ एप्रिल या दिवशी दिले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा अल्प करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय खंडपिठाने रहित केला आहे.

नागपूरसह महाराष्ट्राला अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता असतांना केंद्र सरकारने पुरवठ्यामध्ये कपात केल्याने संकट आणखी गंभीर होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त करत खंडपिठाने ‘सुमोटो’ याचिका (स्वतःहून याचिका प्रविष्ट करून घेणे) प्रविष्ट करून घेतल्यानंतर त्यावर सुनावणीही केली. त्या वेळी हे निर्देश देण्यात आले आहेत. संकटाच्या वेळी महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा ११० मॅट्रिक टनवरून २०० मॅट्रिक टन करणे अपेक्षित होते; मात्र पुरवठ्यामध्ये ५५ टक्क्यांनी कात्री लावण्याचे काम कोणत्या आधारावर केले ? असा प्रश्‍नही खंडपिठाने उपस्थित केला आहे.