मधुर आवाज अन् सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असणार्‍या आणि संत आजी-आजोबांची सेवा भावपूर्ण करून त्यांचे मन जिंकणार्‍या सौ. सायली सिद्धेश करंदीकर !

चैत्र शुक्ल पक्ष नवमी, म्हणजेच रामनवमी (२१.४.२०२१) या दिवशी सौ. सायली सिद्धेश करंदीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. सिद्धेश करंदीकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. सायली करंदीकर

सौ. सायली करंदीकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. सिद्धेश करंदीकर

१. मधुर आवाज आणि संगीताची आवड

‘सौ. सायलीला लहानपणापासून गायनाची फार आवड आहे. तिला रिकामा वेळ मिळाला की, ती गाण्याचा सराव करते. काही दिवसांपूर्वी तिने संत जनाबाईंचा एक अभंग फार अप्रतिम गायला होता. तेव्हा बर्‍याच साधकांनी तिचे कौतुक केले. प्रत्यक्षात सायलीने लौकिकदृष्ट्या संगीताचे कुठलेही शिक्षण घेतलेे नाही, तरीही ती गाण्यातील आकार फार सुंदर घेते. याविषयी तिच्या आई श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘तिने संगीताचे शिक्षण घेतले नाही; परंतु ती लहानपणापासून आश्रमात राहून सेवा आणि साधना करत आहे. त्यामुळेच तिच्या आवाजात गोडवा निर्माण झाला आहे.’’

२. शीघ्र कवयित्री

सायली अन्नपूर्णाकक्षात सेवा करते. तिथे कुणाचा वाढदिवस असेल, तर सायली त्यांच्यावर कविता करते. काही वेळा कविता करण्यासाठी तिला फार थोडा वेळ मिळतो. काही वेळा केवळ १० – १५ मिनिटेच तिच्या हातात असतात; परंतु त्या अत्यल्प वेळेतही ती त्या साधकाला उद्देशून सुंदर कविता करते. एकदा तर अन्नपूर्णाकक्षात एक साधक नवीन आला होता. त्या साधकाला तिने पाहिलेही नव्हते. केवळ अन्नपूर्णाकक्षातील एका साधिकेने त्या साधकाचे गुण सायलीला सांगितले आणि त्यानुसार तिने त्याच्यावर कविता केली, तरी ती कविताही सुंदर झाली होती.

३. सेवेची तळमळ

ती प्रतिदिन सकाळी लवकर आश्रमात सेवेसाठी जाते. कधी कधी तिला सेवेहून घरी परत यायला रात्री उशीरही होतो, तरीही ती शांतपणे आणि मनापासून सेवा करते.

४. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (सायलीचे वडील) यांच्याकडे साधकांची छायाचित्रे किंवा वस्तू यांचे परीक्षण करण्याची सेवा असते. सद्गुरु गाडगीळकाका ‘सायलीचाही अभ्यास व्हावा’, यासाठी काही वेळा तिच्याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतात. तेव्हा बर्‍याच वेळा तिचे उत्तर आणि सद्गुरु गाडगीळकाकांचे उत्तर एकच असते.

आ. आध्यात्मिक त्रास होत असतांना साधक सद्गुरु गाडगीळकाकांना नामजप विचारतात. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाका तिच्याकडूनही त्याचे प्रयोग करवून घेतात. तेव्हाही सद्गुरु गाडगीळकाकांनी शोधलेला नामजप आणि तिने शोधलेला नामजप एकच असतो.

५. गुरूंना अपेक्षित असे करण्याचा प्रयत्न करणे

सायलीचा आवाज चांगला असल्याने अनेक साधक ‘तू सेवेसाठी संगीत सेवेत का जात नाहीस ?’, असे तिला विचारतात. त्यावर तिने त्यांना फार सुंदर उत्तर दिले. तिने त्यांना सांगितले, ‘‘मला संगीताची आवड आहे आणि माझा आवाजही चांगला आहे. हे जरी खरे असले, तरी ‘माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मी कुठली सेवा करणे अपेक्षित आहे ?’, हे श्री गुरुच जाणतात. त्यामुळे मी अन्नपूर्णाकक्षात सेवा करते. तिथेही मी आनंदी आणि समाधानी आहे.’’

तिच्या या उत्तरातून ‘श्री गुरु साधकाला साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला त्याची आवड किंवा कौशल्य यांविषयी सेवा देऊन त्याला साधनेत स्थिर करतात. नंतर साधनेच्या पुढच्या टप्प्याला साधकाची आवड किंवा कौशल्य यांपेक्षा ‘त्याची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी त्याने कुठली सेवा करणे योग्य आहे ?’, तीच सेवा श्री गुरु त्याला देतात’, असे माझ्या लक्षात आले.

६. भाव

६ अ. आश्रमात श्रीरामयाग चालू असल्याचे पाहून सायली यांची भावजागृती होणे आणि त्यांनी साधकांनाही त्याविषयी सांगून भाव ठेवून सेवा करण्यास सांगितल्यावर त्यांचाही भाव जागृत होणे : सायली अन्नपूर्णाकक्षात पोळ्या करण्याची सेवा करते. एकदा ती सकाळी आश्रमात सेवेसाठी येत असतांना आश्रमात श्रीरामयाग चालू होता. ते वातावरण पाहून तिची पुष्कळ भावजागृती झाली. तिने सेवेला आरंभ करतांना तिच्या सहसाधकांना सांगितले, ‘‘आज आश्रमात श्रीरामयाग चालू आहे; म्हणून आपण पोळ्या करतांना ‘रामराज्य अगदी समीप आले असून आपण त्याच्या स्वागतासाठी हा स्वयंपाक करत आहोत’, असा भाव ठेवूया.’’ तिने असे सांगितल्यावर तिच्या सहसाधकांचाही भाव जागृत झाला आणि तेही त्या आनंदाने सेवा करू लागले.

६ आ. संत असलेल्या आजी-आजोबांची सेवा भावपूर्ण करणे : ३ मासांपूर्वी सायली तिच्या आजी-आजोबांकडे (पू. (सौ.) परांजपेआजी आणि पू. परांजपेआजोबा यांच्याकडे) गेली होती. ती आजी-आजोबांना साहाय्य करण्यासाठी जवळपास २ मास त्यांच्याकडे राहिली होती. तेव्हा तिने आजीआजोबांकडे केवळ आजीआजोबा म्हणून पाहिले नाही. ‘आपले आजी-आजोबा संत आहेत. मी त्यांची भावपूर्ण सेवा केली, तरच त्यांचे मन जिंकू शकेन’, असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने आजी-आजोबांची सेवा पुष्कळ भावपूर्ण केली. तिच्या या सेवेचे तिच्या पू. आजीआजोबांनीही पुष्कळ कौतुक केले.’

– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक