आनंदी आणि सतत कृतज्ञताभावात असणारे श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांच्यामुळे ‘स्वतःवर साधनेचे संस्कार कसे होत आहेत’, हे सांगणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची कन्या कु. प्रार्थना !

श्री. महेश पाठक

१. आनंदी

‘माझे बाबा सतत आनंदी असतात आणि दुसर्‍यांना आनंद देतात. ते प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारतात.

कु. प्रार्थना महेश पाठक

२. नम्रता

ते सर्वांशी नम्रतेने वागतात. त्यांच्याशी कुणी नीट बोलले नाही किंवा काही प्रसंग घडले, तरी ते नम्रतेनेच बोलतात. ते मला नेहमी सांगतात, ‘‘आपण (मी, आई आणि बाबा) गुरुदेवांचे सेवक आहोत. आपण नेहमी सेवकभावातच रहायचे.’’

३. प्रेमभाव

ते मला रात्री झोपतांना प्रेमाने गोष्टी सांगतात. माझ्याकडून चूक झाल्यास ते मला प्रेमाने समजून सांगतात. मी त्यांचे ऐकले नाही, तर ते मला शिक्षाही करतात. त्यांच्या मनात सर्वांविषयी पुष्कळ प्रेम आहे. ते माझे काका-काकू, आत्या, आजी (माझ्या आईची आई,) आणि अन्य नातेवाईक यांची प्रेमाने विचारपूस करतात. माझ्या शाळेत आल्यानंतर ते शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी स्वतःहून आनंदाने अन् आदराने बोलतात.

४. कौटुंबिक कर्तव्ये आनंदाने निभावणे

दळणवळण बंदीपूर्वी ते मला शाळेत पोचवणे-आणणे, माझ्यासाठी पोळी-भाजी बनवणे, वेणी घालणे, या गोष्टी आनंदाने करायचे. ते आईला तिच्या कामांत आनंदाने साहाय्य करतात. माझ्या आईला शारीरिक त्रास असल्याने बाबा आईची सेवा (आईला जेवण देणे इत्यादी) आनंदाने करतात. माझे आणि आईचे, तसेच प्रसारातील अन् आश्रमातील सेवा करतांना त्यांनी कधीही चिडचिड केली नाही.

५. सेवाभाव

ते आश्रमात किंवा प्रसारसेवेत शारीरिक अन् कष्टाच्या सेवा करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात. ‘मी थकलो आहे किंवा आता कंटाळा आला’, असे ते कधीच म्हणत नाहीत. ‘आपल्याला काही येत नाही. आपण सेवक आहोत. आपण मिळेल ती सेवा मनापासून करायची’, असे ते मला नेहमी सांगतात.

६. अल्प अहं

ते काही दिवसांपूर्वी रामनाथी आश्रमात आले आहेत. मी त्यांच्या आधीपासून रामनाथी आश्रमात रहात आहे. ते मला आश्रमातील कार्यपद्धतींविषयी विचारतात. ‘मुलगी लहान आहे. तिला कसे विचारायचे ?’, असे त्यांना वाटत नाही.

७. चुकांविषयी संवेदनशीलता

आम्ही (मी, आई आणि बाबा) प्रतिदिन बैठक घेतो. बाबा त्यांच्याकडून झालेल्या चुकांसाठी लगेच प्रायश्‍चित्त घेतात. आमची बैठक झाल्यावर ते १० उठाबशा काढणे, क्षमा मागणे, असे प्रायश्‍चित्त लगेच पूर्ण करतात.

८. स्वतः कृतज्ञताभावात राहून मुलीवर चांगले संस्कार करणे

बाबा प्रतिदिन मला ‘सगळ्यांकडून काय शिकलीस ?’, असे विचारतात. ‘धान्य निवडणारे साधक कष्ट करून धान्य निवडतात, स्वयंपाकघरातील साधक कष्ट करून महाप्रसाद बनवतात. त्यामुळे आपल्याला दैवी महाप्रसाद मिळतो. सगळ्या साधकांकडून शिकायचे. वयस्कर साधक किती सेवा करतात. त्यांच्याशी आदराने बोलायचे’, असे सांगून ते माझ्यावर चांगले संस्कार करत असतात. बाबांमुळे मला साधनेत पुष्कळ साहाय्य होते.

९. गुरुदेवा, दिलेत तुम्ही मला निर्मळ मनाचे बाबा ।

परम पूज्य गुरुदेवांनी दिले मला खूप छान छान बाबा ।
गुण वर्णू कसे त्यांचे तूच सांग देवा ॥ १ ॥

कितीही अडचणी आल्या,
तरी आनंदी राहून इतरांना आनंद देती ।

प्रत्येक कृती सेवाभावाने
करूनी सेवाभावात अखंड रहाती ॥ २ ॥

सेवाभाव, नम्रभाव असे त्यांच्या अंतरी ।
त्यामुळेच सहजभावात नेहमीच ते रहाती ॥ ३ ॥

समभावाने ते सर्वांशी रहाती ।
निर्मळ मनामुळेच ते सदैव हसतमुख असती ॥ ४ ॥

परम पूज्य गुरुदेव, सद्गुरु स्वातीताई
आणि पू. शिल्पाताई (टीप १)।
यांच्या प्रती असे त्यांच्या मनात भोळाभाव ।
नाव घेता गुरुदेवांचे जागृत होतो त्यांचा भाव ॥ ५ ॥

गुरुदेवा, तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ।
दिलेत तुम्ही मला असे निर्मळ मनाचे बाबा ॥ ६ ॥

टीप १ – एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

– गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल,
कु. प्रार्थना पाठक, (मुलगी) (वय १० वर्षे), पुणे (१९.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक