‘शेवटच्या श्‍वासापर्यंत गुरुदेवांची सेवा व्हावी’, या ध्यासाने सेवारत असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल (वय ७८ वर्षे) !

साधनेचे सर्व प्रयत्न चिकाटीने करतांना ‘शेवटच्या श्‍वासापर्यंत गुरुदेवांची सेवा व्हावी’, या ध्यासाने सेवारत असलेल्या कोची सेवाकेंद्रातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल (वय ७८ वर्षे) !

श्रीमती सौदामिनी कैमल

श्रीमती सौदामिनी माधवन् कैमल या सनातनचे पूर्णवेळ साधना करणारे साधक श्री. नंदकुमार कैमल यांच्या आई आहेत. त्या गेली १९ वर्षांपासून साधना करत आहेत. ५ वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चे घर विकून पूर्णवेळ सेवाकेंद्रातच येऊन रहाण्याचे ठरवले. तेव्हापासून त्या कोची येथील सेवाकेंद्रात रहात आहेत. त्यांच्यातील अनेक दैवी गुणांमुळे त्यांनी साधनेत लवकर प्रगती केली. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानंतर वर्ष २०१९ पर्यंत प्रतिवर्षी त्यांची आध्यात्मिक पातळी वाढतच राहिली. आता त्यांची पातळी ६८ टक्के आहे. कोची येथील सेवाकेंद्रात रहाणार्‍या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.

१. साधनेच्या सर्व प्रयत्नांत सातत्य ठेवणे

‘कोणत्याही कृती वा साधना करणे असो, या दोन्हींमध्ये आजींमधे ‘सातत्य’ हा गुण दिसून येतो. त्या अनेक वर्षांपासून प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठतात. त्यानंतरची त्यांची दिनचर्या ठरलेली असते. नामजप करणे, दैनंदिनी लिहिणे, स्वयंसूचना सत्रे करणे, तसेच फलकावर चुका लिहिणे, असे व्यष्टी साधनेचे सगळे प्रयत्न त्यांच्याकडून नियमित होतात. या प्रयत्नांत खंड पडू नये, याची त्या काळजी घेतात.

२. वेळेचे पालन करणे

प्रत्येक कृती करण्याची त्यांनी वेळ ठरवली आहे आणि त्या त्याचे कटाक्षाने पालन करतात. अधिकोषातील कामेही त्या वेळोवेळी करतात. त्यांचे वय ७८ वर्षे झाले असले, तरीही त्या साधकांसाठी अल्पाहार आणि महाप्रसाद वेळेत बनवतात. त्या प्रत्येक गुरुवारी रात्री १० ते १२ पर्यंत साधकांसाठी असलेला भाववृद्धी सत्संग ऐकून झोपतात आणि दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजता तेवढ्याच उत्साहाने उठून पुढील दिनचर्या चालू करतात. त्या पहाटे उठून स्वयंपाकघरात अल्पाहार बनवण्यासाठी पूर्वतयारी करतात आणि नंतर सकाळी ६.३० वाजता नामजपाला बसतात.

३. संतांचे आज्ञापालन करणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन किंवा संतांनी सांगितलेली सूत्रे यांचे त्या आज्ञापालन करतात. ‘आपल्यावर संतांची कृपा आहे; म्हणून ‘आपली साधना होत आहे’, असे त्यांना वाटते. एकदा त्यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितले, ‘‘भाववृद्धी सत्संगात तुम्ही तुमचे प्रयत्न सांगा.’’ तेव्हापासून आज्ञापालन म्हणून त्या प्रत्येक भाववृद्धी सत्संगात त्यांचे प्रयत्न सांगतात.

४. सेवेची तळमळ असल्याने भ्रमणभाषवरून संपर्क करून गुरुपौर्णिमेची सेवा करणे

आजी प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला त्यांचे नातेवाईक, तसेच सेवाकेंद्राजवळ रहाणारे जिज्ञासू यांच्याकडून धर्मकार्यासाठी अर्पण गोळा करतात. या वर्षी कोरोनामुळे त्यांना बाहेर जाणे शक्य नव्हते; पण त्यांनी ओळखीच्या सगळ्यांना संपर्क केला. प्रतिदिन ४ – ५ जणांना संपर्क करून त्या ‘साधना’ आणि ‘धर्मकार्यासाठी अर्पण देणे’, यांविषयी सांगायच्या. नंतर आजींनी संपर्क केलेल्या व्यक्तींना नंदकुमारदादा ‘ऑनलाईन’ अर्पण करण्याविषयीची आवश्यक ती माहिती पाठवायचे. अशा प्रकारे संपर्क केलेल्यांपैकी अनेक जणांनी अर्पण दिले, तर काहींनी नामजप करायला आरंभ केला.

५. शिकण्याची वृत्ती

रामनाथी आश्रमात गेल्यावर त्यांनी सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून ‘साधकांचा व्यष्टी आढावा कसा घ्यायचा ?’, ते शिकून घेतले. आता त्या साधकांचा व्यष्टी आढावा घेतात आणि साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देतात.

६. प्रेमभाव

अ. कोणत्याही साधकाला आध्यात्मिक त्रास होत असेल किंवा त्याच्या मनात नकारात्मक विचार येत असतील, तर आजी त्याला साहाय्य करतात. ‘त्या साधकाला बरे वाटावे’, यासाठी प्रार्थना करतात.

आ. कोणी रुणाईत असेल, तर आजी त्याच्या जेवणातील पथ्याची काळजी घेतात.

इ. त्या अजूनही प्रसारातील साधक, धर्मप्रेमी, त्यांच्या जुन्या मैत्रिणी, त्यांचे विद्यार्थी, नातेवाईक इत्यादींच्या संपर्कात आहेत. त्या मधे मधे दूरभाष करून त्यांची विचारपूस करतात आणि त्यांना साधना करायला सांगतात. प्रसारातील साधक आणि धर्मप्रेमी आश्रमातील साधकांना दूरभाष करतात. तेव्हा ते आजींची चौकशी करतात.

ई. साधकांची आध्यात्मिक उन्नती झाली किंवा कुणी संत झाले, तर आजींना खूप आनंद होतो आणि भावाश्रू येतात.

७. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला कृतज्ञताभाव !

आजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता आहे. ‘माझ्या जीवनात गुरुदेव आले; म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. या वयातही गुरुदेवच माझ्याकडून प्रत्येक कृती करवून घेत आहेत’, असे त्यांना सतत वाटते. ‘सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करण्याची संधी प्राप्त झाली’, यासाठी त्यांना प.पू. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.

८. आध्यात्मिक पातळीचा विचार न करता शेवटच्या श्‍वासापर्यंत गुरुसेवा करण्याचा ध्यास असलेल्या कैमलआजी !

प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळी साधकांच्या वर्षभर झालेल्या आध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी सांगितली जाते. मागील वर्षी आजींची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती आणि या वर्षीही (वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेला) ती ६८ टक्केच राहिली. ‘या वर्षी पातळी वाढली नसल्याचे कळल्यावर त्यांना दुःख होईल’, असे आम्हाला वाटले होते; पण आजी म्हणाल्या, ‘‘प्रगती कशी होते ?’, हे मला ठाऊक नाही. आपल्यावर गुरुदेवांची कृपा आहे. ‘शेवटच्या श्‍वासापर्यंत साधना करणे आणि गुरुदेवांची सेवा करणे’, हेच आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण पातळीचा विचार करायला नको.’’

(‘बर्‍याच साधकांना आध्यात्मिक पातळी न्यून झाली किंवा तेवढीच राहिली, तर वाईट वाटते आणि काही वेळा त्यांचे साधनेचे प्रयत्न न्यून होऊ लागतात. स्वतःच्या आध्यात्मिक पातळीकडे साक्षीभावाने पहाणार्‍या आणि केवळ गुरुसेवेचा ध्यास असलेल्या कैमलआजींचे विचार वाचून ‘साधकांनी आध्यात्मिक पातळीच्या संदर्भात कसा दृष्टीकोन ठेवायला हवा ?’, हे लक्षात येते.’ – संकलक)

– कोची (केरळ) सेवाकेंद्रातील सर्व साधक (सप्टेंबर २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक