नवी देहली – गेल्या २४ घंट्यांमध्ये देहलीमध्ये २४ सहस्रांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. यावरून कोरोनाचा संसर्ग किती गतीने वाढत आहे, याचा अंदाज येत आहे. देहलीमध्ये रुग्ण सापडण्याचा दर वाढून ३० टक्के झाला आहे. एका दिवसापूर्वी तो २४ टक्के इतका होता. कोरोना रुग्णांसाठी ज्या खाटा आरक्षित होत्या, त्या गतीने भरत चालल्या आहेत. अतीदक्षता विभागातही खाटांची कमतरता आहे. संपूर्ण देहलीत आता १०० पेक्षा अल्प आयसीयू खाटा उपलब्ध आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. तो उपलब्ध होण्याविषयी आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले.