शहडोल (मध्यप्रदेश) येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू !

सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे, हे पहाता आता देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

शहडोल (मध्यप्रदेश) – येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ६ रुग्णांचा मृत्यू हा रात्री उशिरा झाला. ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. ‘ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता, तर ऑक्सिजनचे प्रेशर न्यून झाले होते’, असे मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांनी सांगून सारवासारव केली आहे. ‘आयसीयूमध्येही अनेक रुग्ण आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असता, तर आणखी मृत्यू झाले असते. ऑक्टिजनचा तुटवडा आहे; पण उपलब्ध ऑक्सिजनच्या माध्यमातून रुग्णांना पुरेसे ऑक्सिजन दिला जात आहे’, असेही अधिष्ठाता म्हणाले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी या घटनेवरून भाजप सरकारवर टीका केली आहे. कमलनाथ यांनी ट्वीट करून म्हटले की, ऑक्सिजनच्या अभावी शहडोलमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. भोपाळ, इंदूर, उज्जैन, सागर, जबलपूर, खंडवा आणि खरगोन येथे ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांचे मृत्यू होऊनही सरकार जागे का झाले नाही ? ऑक्सिजनच्या अभावी होणारे मृत्यू कधी थांबतील ? असे प्रश्‍न उपस्थित केले.